Pimpri News: पिंपरी-चिंचवड महापालिकेतील पोटनिवडणुका लांबणीवर

एमपीसी न्यूज – कोरोनामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेतील निधन झालेल्या तीन नगरसेवकांच्या रिक्त जागेवरील पोटनिवडणुका लांबणीवर गेल्या आहेत. सर्वसाधारण परिस्थितीत पोटनिवडणुका सहा महिन्याच्या आत घेतल्या जातात. त्यानुसार डिसेंबर अखेर निवडणुका होतील अशी शक्यता होती. पण, कोरोनाच्या अपवादत्मक परिस्थितीमुळे निवडणुका झाल्या नाहीत. आता राज्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका संपल्यानंतर मार्च महिन्यात पोट निवडणुका होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

प्रभाग क्रमांक 1 चिखली मधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आलेले दत्ता साने यांचे कोरोनामुळे 4 जुलै 2020 रोजी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे जागा रिक्त झाली आहे. प्रभाग क्रमांक 14 काळभोरनगर, चिंचवड स्टेशन, दत्तवाडी प्रभागातून राष्ट्रवादीकडून निवडून आलेले जावेद शेख यांचेही कोरोनामुळे निधन झाले आहे. 31 जुलै 2020 रोजी त्यांचे निधन झाले.

प्रभाग क्रमांक चार दिघी-बोपखेलमधून भाजपच्या चिन्हावर निवडून आलेल्या लक्ष्मण उंडे यांचे 26 सप्टेंबर 2020 रोजी कोरोनामुळे निधन झाले. कोरोनाने तीन नगरसेवकांना हिरावून घेतले आहे. त्यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होणार आहे.

लोकप्रतिनिधीचे निधन झाल्यास सहा महिन्याच्या आतमध्ये पोटनिवडणूक घेतली जाते. त्यानुसार डिसेंबर अखेर या तीन जागेवर पोटनिवडणुका होतील असे अपेक्षित होते. परंतु, कोरोनाच्या अपवादत्मक परिस्थितीमुळे निवडणुका झाल्या नाहीत. निवडणुका लांबणीवर गेल्या आहेत. राज्यातील 14 हजार ग्रामपंचायतीच्या निवडणूका सुरु आहेत. ग्रामपंचायतीच्या निवडणूका संपल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूका होतील. मार्च महिन्यात महापालिकेची पोटनिवडणूक होण्याची शक्यता वर्तविली जाते.

निवडणूक बिनविरोध होणार?
कोरोनामुळे राष्ट्रवादीचे दत्ता साने, जावेद शेख आणि भाजपचे लक्ष्मण उंडे या तीन नगरसेवकांचे निधन झाले आहे. दोन राष्ट्रवादी आणि एका भाजप नगरसेवकांचा कोरोना महामारीने बळी घेतला आहे. पोटनिवडणुकीत सहानभुतीची लाट असते. निधन झालेल्या नगरसेवकांच्या कुटुंबातील सदस्याला उमेदवारी देवून बिनविरोध निवडून आणण्याचा विचार होऊ शकतो.

महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता आहे. काटावरचे बहुमत नाही. मार्च महिन्यात निवडणूक झाल्यास केवळ सहा महिन्याचा कालावधी मिळणार आहे. त्यामुळे पोट निवडणूक बिनविरोध होऊ शकते.

निवडणूक विभागाचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब खांडेकर म्हणाले, नगरसेवकांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागांची माहिती निवडणूक आयोगाला कळविली आहे. निवडणुकीबाबत अद्याप कोणत्याही सूचना प्राप्त झाल्या नाहीत.

नगरसचिव उल्हास जगताप म्हणाले, ”सर्वसाधारण परिस्थितीमध्ये रिक्त झालेल्या जागेवर सहा महिन्यात पोटनिवडणुका घेतल्या जातात. सध्या कोरोनाची परिस्थिती आहे. त्यामुळे पोट निवडणूक घेण्यास विलंब होत असेल”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.