Pimpri News : पिंपरी चिंचवडकरांनो वैध कारण असेल तरच घराबाहेर पडा; शहरात पोलिसांकडून कठोर तपासणी

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवडकरांनो वैध कारण असेल अथवा प्रवासाचा पास असेल तर आणि तरच घराबाहेर पडा. विनाकारण भटकत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आल्यास कठोर कारवाई केली जाईल, असे आवाहन पिंपरी चिंचवड पोलिसांकडून करण्यात येत आहे.

कोरोना साथीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. नागरिकांना विनाकारण घराबाहेर फिरण्यास मनाई करण्यात आली आहे. वैध कारण असेल अथवा एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठीचा ई-पास काढला असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे, असे आवाहन पिंपरी चिंचवड पोलिसांनी केले आहे.

शहरात पिंपरी आणि निगडी येथील चौकात राज्य राखीव पोलीस दलाच्या (एसआरपीएफ) दोन तुकड्या तैनात आहेत. पोलीस आणि एसआरपीएफच्या मदतीने संचारबंदीची अंमलबजावणी कठोरपणे केली जात आहे. विनामास्क फिरणाऱ्या तसेच अन्य नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस कारवाई करीत आहेत.

यापुढे जाऊन शहरात विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांच्या पोलीस रँडमली रॅपिड अँटीजेन टेस्ट देखील करत आहेत. या टेस्ट मध्ये पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्यास संबंधित नागरिकांना योग्य उपचारासाठी दाखल केले जात आहे. त्यामुळे नागरिकांनी घरात, सुरक्षित राहावे, असे आवाहन पिंपरी चिंचवड पोलीस करीत आहेत.

सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सागर कवडे म्हणाले, “शहरात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून पोलिसांकडून काटेकोरपणे संचारबंदीची अंमलबजावणी केली जात आहे. विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची अचानकपणे रॅपिड अँटीजेन टेस्ट देखील केली जात आहे. नागरिकांनी घरात बसून कोरोना साथीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सहकार्य करावे.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.