Pimpri News: महापालिकेतर्फे सदनिकांची सोडत, 84 लाभार्थ्यांना हक्काचे घर

एमपीसी न्यूज – केंद्र व राज्य शासनाच्या सहकार्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने प्राधिकरण सेक्टर क्रमांक 17 व 19 चिखली येथे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी घरकुल योजना राबविण्यात येत आहे. या प्रकल्पातील 2 सोसायट्यांच्या इमारती मधील एकूण 84 लाभार्थ्यांना सदनिकांचे संगणकीय सोडतीद्वारे वाटप करण्यात आले.

महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते आज (गुरुवारी) ही संगणकीय सोडत काढण्यात आली. झोपडपट्टी निर्मुलन व पुनर्वसन विभाग येथे झालेल्या सोडतीच्या कार्यक्रमास उपमहापौर हिराबाई घुले, पक्षनेते नामदेव ढाके, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, प्रशासन अधिकारी श्रीकांत कोळप, मुख्य लिपिक हनमंता निली, सुवर्णा केदारी, उज्वला गोडसे प्रोग्रामर, लिपिक योगिता जाधव, तसेच समन्वयक दर्शन शिरुडे यांच्यासह लाभार्थी उपस्थित होते.

यावेळी नियोजित घरकुल सहकारी गृहरचना संस्थासाठी तात्पुरत्या स्वरुपात निवड करण्यात आलेल्या सोसायटी क्र. 142 इमारत क्र. डी-5 चे अध्यक्ष लक्ष्मण रघुनाथ साळुंखे, सोसायटी क्र. 143 इमारत क्र. बी-11 चे अध्यक्ष अजय श्रीकांत कुलकर्णी यांचा महापौर उषा ढोरे यांचे शुभहस्ते सत्कार करण्यात आला.

घरकुलच्या माध्यमातुन नागरीकांचे घराचे स्वप्न साकार होत असुन त्याचा उपयोग योग्य पद्धतीने करावा. आपल्या परिसरात स्वच्छता ठेवावी व मिळालेली सदनिका विक्री अथवा भाड्याने देवु नये. लाभार्थींनी आता हक्काचे व स्वतःचे घर मिळाल्याने इमारतीमध्ये सलोख्याचे वातावरण निर्माण करावे. घराचा वापर स्वत: करावा. परिसर स्वच्छ ठेवावा. इमारती भोवती झाडे लावून त्याचे योग्य प्रकारे निगा व जतन करावे असे महापौर उषा ढोरे म्हणाल्या. यावेळी अण्णा बोदडे यांनी प्रकल्पाची माहिती, घराचा वापर, येणारे देयके व बँकेचे हप्ते वेळेवर भरणेबाबत मार्गदर्शन केले. विष्णु भाट यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.