Pimpri News: शहरात रविवारी ‘प्लॉगेथॉन’; महापालिका कर्मचा-यांनी कुटुंबासह सहभागी व्हावे महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्या सूचना

एमपीसी न्यूज – प्रत्येक घरापर्यंत स्वच्छाग्रह उपक्रम पोहोचविणे हा आपला उद्देश असून प्लॉगेथॉन मोहिम या चळवळीची सुरुवात आहे. ही मोहिम यशस्वी करण्यासाठी महापालिकेच्या सर्व अधिकारी कर्मचा-यांनी कुटुंबासह यामध्ये सहभागी व्हावे, अशी सूचना आयुक्त राजेश पाटील यांनी केली. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करावे, असे आवाहन देखील त्यांनी केले.

शहरात येत्या रविवारी सकाळी सात ते दहा या वेळेत प्लॉगेथॉन मोहिम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेचे नियोजन करण्यासाठी आयुक्त राजेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली. अतिरिक्त आयुकत विकास ढाकणे, जितेंद्र वाघ, शहर अभियंता राजन पाटील, मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय, सहशहर अभियंता मकरंद निकम, श्रीकांत सवणे, रामदास तांबे, संजय कुलकर्णी, संदेश चव्हाण, अशोक भालकर, सतिश इंगळे, मुख्य वित्त्‍ व लेखा अधिकारी जितेंद्र कोळंबे, मुख्य माहिती तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, उप आयुक्त सुभाष इंगळे, मनोज लोणकर, अजय चारठाणकर, संदीप खोत, आशा दुरगुडे, चंद्रकांत इंदलकर, सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांच्यासह सर्व क्षेत्रिय अधिकारी व ‍विभाग प्रमुख उपस्थित होते.

माझी वसुंधरा जनजागृतीची ई-शपथ घेवून बैठकीची सुरुवात करण्यात आली. मोहिमेबददल मार्गदर्शन करताना आयुक्त पाटील म्हणाले, प्लॉगेथॉन मोहिम शहरातील 32 प्रभागातील 64 ठिकाणी राबविण्यात येणार आहे. पिंपरी-चिंचवड शहराला देशातील प्रथम क्रमांकाचे स्वच्छ व सुंदर शहर बनविण्याचे स्वप्न असून ते प्रत्यक्षात उतरविण्यासाठी महापालिका अधिकारी कर्मचा-यांनी पुढाकार घ्यावा, असे आयुक्त पाटील यावेळी म्हणाले.

महापालिकेबद्दल जनमानसात असलेली प्रतिमा उंचावण्यासाठी प्लॉगेथॉन मोहिम महत्वपूर्ण ठरणार असून नागरी सहभाग वाढावा, यासाठी लोकप्रतिनिधी, संस्था, मंडळे, संघटना, ज्येष्ठ नागरिक संघ, विद्यार्थी, बचत गट, पर्यावरणप्रेमी आणि स्वच्छतेबद्दल जागृत असलेल्या व्यक्तींना या मोहिमेत सहभागी करुन घ्यावे. आपला परिसर स्वच्छ असावा असे प्रत्येकाला वाटते, त्यासाठी सर्वांनी आपले योगदान दिले पाहिजे. त्यामुळे प्रत्येकाने स्वयंस्फुर्तीने प्लॉगेथॉन मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन आयुक्त राजेश पाटील यांनी यावेळी केले.

माझी वसुंधरा, स्वच्छ भारत अभियान याबाबत संगणकीय सादरीकरणाद्वारे बैठकीत माहिती देण्यात आली. या अभियानांतर्गत आवश्यक असलेल्या सर्व बाबींची पूर्तता विभागप्रमुखांनी वेळेत करावी, असे आदेश आयुक्त राजेश पाटील यांनी यावेळी दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.