Pune news: कोरोना संसर्गाची दुसरी लाट येण्याची शक्यता लक्षात घेवून नियोजन करा – अजित पवार

काही रुग्णालये महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यास टाळाटाळ करीत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहे.

एमपीसी न्यूज – कोरोनाबाधित रुग्ण म्हणून खासगी रुग्णालयात दाखल झाल्यानंतर काही रुग्णालये महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यास टाळाटाळ करीत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहे. त्यामुळे अशा रुग्णालयावर कार्यवाही करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले. केंद्रीय पथकाच्या इशाऱ्यानुसार कोरोना संसर्गाची दुसरी लाट येण्याची शक्यता लक्षात घेवून प्रशासनाने सतर्क राहून कोरोना विषाणूचा संक्रमण होणार नाही, या अनुषंगाने नियोजन करावे, असे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील विधानभवन सभागृहात संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत ‘कोविड-19’ विषाणू प्रादुर्भाव निमूर्लन आढावा बैठक पार पडली. यावेळी दृकदृश्य प्रणालीद्वारे विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे उपस्थित होत्या.

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, खासदार डॉ.अमोल कोल्हे, आमदार अशोक पवार, संजय जगताप, राहुल कुल, सुनील शेळके, चेतन तुपे, अतुल बेनके यांच्यासह विविध पदाधिकारी तसेच विभागीय आयुक्त सौरभ राव, ससून रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी एस.चोक्कलिंगम, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया, पुणे पालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी-चिंचवड पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास दिवसे,पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त शांतनु गोयल, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख, आरोग्य विभागाचे सल्लागार डॉ. सुभाष साळुंके, ससूनचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार, जिल्हा टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. डी.बी. कदम आदी वरिष्ठ अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, जिल्ह्यातील काही रुग्णालये महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या पॅनलवर आहेत. तथापि, ती रुग्णालये पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यास टाळाटाळ करीत आहेत. अशा रुग्णालयांवर कार्यवाही करण्यायत यावी.

केंद्रीय पथकाच्या इशाऱ्यानुसार कोरोना संसर्गाची दुसरी लाट येण्याची शक्यता लक्षात घेवून प्रशासनाने सतर्क राहून कोरोना विषाणूचा संक्रमण होणार नाही,  या अनुषंगाने नियोजन करावे. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही राज्यव्यापी मोहिम हाती घेतलेली आहे. या मोहिमेचा दुसरा टप्पा स्थानिक लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था इत्यादीच्या मदतीने अधिक प्रभावीपणे राबवावा.

मृत्यूदर कमी करण्याबाबत सूक्ष्म नियोजन करुन तो शुन्यावर आणण्यासाठी प्रयत्न करावेत. मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई करावी. नवरात्र, दसरा, दिवाळी या सणासुदीच्या काळात नागरिक घराबाहेर पडल्यास कोरोना विषाणूचे संसर्ग वाढण्याची शक्यता विचारात घेवून प्रशासनानी सतर्क राहून कामकाज करावे, अशा सूचना पवार यांनी प्रशासनाला दिल्या.

विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी कोरोना स्थिती, उपाययोजनांची माहिती दिली. ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहीम प्रभावीपणे राबवून घरोघरी सर्व्हेक्षणावर भर देण्यात येत आहे तसेच लोकशिक्षण,जनजागृतीवर विशेष लक्ष देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी कोरोनाबाधित रुग्णाचे होणारे मृत्य याबाबत विश्लेषण करण्याबरोबरच सूक्ष्म नियोजन करुन मृत्यदर शुन्यावर आणणे, कोरोना विषाणूचा संसर्ग पसरणार नाही, यावर विशेष लक्ष देण्यात येत आहे, असे सांगितले.

पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार व पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी शहरी भागातील कोरोना प्रतिबंधासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.