Pimpri News: एकल महिलांच्या पुर्नवसनासाठी आराखडा करा, नीलम गोऱ्हे यांचे पालिका प्रशासनाला निर्देश

एमपीसी न्यूज – कोरोनामुळे पतीचे निधन झाल्याने विधवा झालेल्या एकल महिलांचे पुर्नवसन, कौशल्य विकास करण्यावर भर द्यावा. निराधार झालेल्या महिलांच्या मुलांवर बालमजुरी, बालविवाहाची वेळ ओढावू नये, यासाठी प्रयत्न करावेत. महिलांना कोणती मदत हवी आहे. त्याचा अभ्यास करुन मदती करण्यासाठी टास्क फोर्स बरोबरच महापालिकेने उपसमितीची स्थापना करावी. एकल महिलांच्या पुर्नवसनासाठी सामाजिक संस्थेच्या मदतीने आराखडा तयार करावा, असे निर्देश महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पिंपरी पालिका प्रशासनाला दिले.

डॉ. निलम गोऱ्हे यांनी आज (सोमवारी) पिंपरी महापालिकेला भेट दिली. महापौर उषा ढोरे यांनी त्यांचे स्वागत केले. उपमहापौर हिराबाई घुले, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, शिवसेना गटनेते राहूल कलाटे, अपक्ष आघाडी गटनेते कैलास बारणे, आयुक्त राजेश पाटील, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, उपजिल्हाधिकारी जयश्री कटारे, नगरसेवक अ‍ॅड. सचिन भोसले, नगरसेविका मीनल यादव, अश्विनी वाघमारे, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, उल्हास जगताप आदी अधिकारी उपस्थित होते. मारामारीच्या काळात महानगरपालिकेने केलेल्या कामगिरीची आयुक्त राजेश पाटील यांच्याकडून माहिती घेतली. तसेच कोरोना कालावधीत शासनाने जाहीर केलेल्या माथाडी कामगार, बांधकाम कामगार, घरेलू कामगार, रिक्षा चालक, एकल महिला, निराधार मुले यांच्याकरीता असलेल्या योजनांच्या अंमलबजावणीबाबत महापालिकेने केलेल्या कामकाजाचा देखील त्यांनी आढावा घेतला.

पत्रकारांशी बोलताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने 2200 महिला विधवा असल्याचे सांगितले. पतीच्या निधनानंतर मालमत्ता पत्नीकडे कशी राहील. यासाठी महापालिकेने कायद्यासह महिलांना इत्यादी मदत करावी. निराधार महिलांना महापालिकेने 25 हजार रुपयांचे अर्थसहाय्य दिले. कोरोना काळात बचत गटांनाही 5 हजार रुपयांची मदत केली. असंघटित कामगारांची नोंदणी करण्यासाठी पालिकेने 1 ते 9 सप्टेंबर दरम्यान मोहिम राबवावी.

राज्य शासनाच्या योजना लोकांपर्यत पोहोचविण्यासाठी जे काम करणे आवश्यक आहे. ते महापालिकेने करावे. योजनांचा प्रसार, प्रचार करावा. नागरिकांना त्याचा लाभ मिळवून द्यावा. कोरोना काळात केंद्र सरकारने अतिशय तुटपुंजी मदत केली. पीएम स्वनिधी शिवाय पालिकेला केंद्र सरकारकडून कोणताही निधी आला नाही. असंघटित क्षेत्रातील लोकांना मदत करणे गरजेचे आहे. पण, केंद्र सरकारने काहीच मदत केली नसल्याचा आरोपही गोऱ्हे यांनी केला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.