Pimpri news: सत्ताधारी भाजपकडून कोरोनाबाधित रुग्णांच्या जीवाशी खेळ; राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

'रेमडेसिवीर’च्या तुटवड्यावरून राष्ट्रवादीचा 'हल्लाबोल'

एमपीसी न्यूज – महापालिकेच्या रुग्णालयातील रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा उपलब्ध नसल्याचे मूळ कारण भ्रष्टाचार आहे. सत्ताधारी भाजपला जोपर्यंत पाहिजे तसे कमिशन मिळत नाही, तोपर्यंत ते रेमडेसिवीर इंजेक्शन खरेदी करत नाही. कोरोना साथीच्या या भयंकर परिस्थितीत सत्ताधारी भाजपने उरली सुरली शरम सुद्धा चार पैश्यासाठी गहाण टाकलेली दिसत आहे. भाजप कोरोनाबाधित रुग्णाच्या जीवशी खेळत असल्याचा आरोप करत शहरातील जनतेच्या जीवाशी खेळणे सत्ताधाऱ्यांना नक्कीच महागात पडणार असल्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसने दिला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनी आज, शनिवारी पत्रकार परिषद घेतली. महापालिकेकडे रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा शिल्लक नसल्याच्या बातम्या येऊ लागल्या. कोरोना साथीच्या काळात गंभीर रुग्णांसाठी रेमडीसिवीर इंजेक्शन जीव वाचवणारे औषध आहे. शहर परिसरात दररोज तीन हजारच्या आसपास कोरोना बाधित रुग्ण आढळून येत असून, शहरातील जवळ जवळ सर्व रुग्णालये संपूर्ण क्षमतेने भरलेली आहेत.

महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पार्टी आणि प्रशासनाने रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध न ठेवल्याने कोरोना बाधित गंभीर रुग्ण जीवाशी खेळत होते.

या परिस्थितीची दखल घेऊन राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसने सत्ताधारी भाजप आणि पालिका प्रशासनाविरोधात महानगरपालिकेच्या आवारात आंदोलन केले. आंदोलन चालू असताना महापालिकेचे अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे,   सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी महापालिकेच्या सर्व रुग्णालयांसाठी भांडार विभागाकडे 900 रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा उपलब्ध आहे. याचबरोबर बाहेरून वाढीव 200 रेमडीसिवीर इंजेक्शन उपलब्ध करून दिलेले आहेत, असे सांगितले. परंतु, हे चुकीचे आहे.

_MPC_DIR_MPU_II

शहरभरात कोरोनामुळे गंभीर आजारी असलेल्या रुग्णांचे नातेवाईक शहरात रेमडेसिवीर इंजेक्शन घेण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात फिरत होते आणि आजही फिरत आहेत. खाजगी मेडिकलमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शन मिळत नाहीत.

अश्या गंभीर परिस्थितीत रुग्णांचे नातेवाईक राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना फोन करून विचारणा करत आहेत कि, कुठून तरी इंजेक्शन मिळवून द्या. राष्ट्रवादी युवक आणि वरिष्ठ नेत्यांना दररोज कमीत कमी 30 ते 40 फोन रेमडेसिवीर इंजेक्शन मागण्यासाठी येत आहेत.

शहरातील सत्ताधारी भाजपला जर शहरातील नागरिक जिवंत राहावे, याविषयी थोडीशी संवेदना असेल तर त्यांनी तत्काळ रेमडेसिवीर इंजेक्शनचा महानगरपालिकेकडील साठा कागदपत्रासहित सार्वजनिक करावा. याचबरोबर दि. 6 एप्रिल 2021 पासून आजपर्यंत महापालिकेने किती करोना बाधित रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शन मोफत मिळवून दिले याचा तपशील जाहीर करावा.

याचबरोबर रेमडेसिवीर इंजेक्शनच्या साठ्याच्याबाबत झालेल्या घोटाळ्याची महापालिका आयुक्त पातळीवर चौकशी केली जावी, अशी आमची मागणी असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.