Pimpri News : “एकात्मतेचा घोष करणारी कविता कालबाह्य होत नाही!” – प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस

एमपीसी न्यूज – “जी कविता बहुसांस्कृतिक विश्वाच्या एकात्मतेचा घोष करते, ती कधीच कालबाह्य होत नाही. सविता इंगळे यांची कविता महाजन अन् बहुजन यांना सांधणारी आहे!” असे गौरवोद्गार 89 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि समीक्षक प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस यांनी काढले.

हॉटेल कुंदन पॅलेस हॉल, जुना मुंबई-पुणे महामार्ग, आकुर्डी येथे रविवार (दि.22 नोव्हेंबर) रोजी  कवयित्री आणि सामाजिक कार्यकर्त्या सविता इंगळे उर्फ सावी लिखित ‘चाकोरीतल्या जगण्यामधून’ या कवितासंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस बोलत होते.

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. सुरेश बेरी, ज्येष्ठ साहित्यिक रमेश वाकनीस, रुक्मिणी व्हटकर, प्रकाशक नितीन हिरवे यांंची व्यासपीठावर, तसेच ज्येष्ठ साहित्यिक पुरुषोत्तम सदाफुले, राज अहेरराव, राजन लाखे, राजेंद्र कांकरिया, राजेंद्र घावटे, सुरेश कंक, राजकुमार काळभोर, महेंद्रकुमार गायकवाड यांच्यासह पिंपरी-चिंचवडमधील अनेक साहित्यिकांची या सोहळ्यात उपस्थिती होती.

सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. नंदकुमार मुरडे यांनी प्रास्ताविक केले. या प्रसंगी आपल्या मनोगतातून कवयित्री सविता इंगळे यांनी, “जीवनाच्या प्रवासात भेटलेल्या प्रत्येकाकडून शिकण्याचा माझा प्रयत्न असून या प्रवासात महिलांना होणारा जाच मला अस्वस्थ करीत गेला. अजूनही स्त्रीला दुय्यम दर्जा दिला जातो; आणि त्याचेच प्रतिबिंब माझ्या कवितांमध्ये पडते!” अशा भावना व्यक्त करीत आईला लिहिलेल्या अनावृत्त पत्राचे अभिवाचन केले.

डॉ. सुरेश बेरी यांनी, “महिलांचे दु:ख कवितांच्या माध्यमातून प्रकट व्हावे!” अशी अपेक्षा केली; तर रमेश वाकनीस यांनी, “भूमिकेशी प्रामाणिक राहून लिहिता आले पाहिजे!” असा विचार मनोगतातून मांडला.

प्रकाशनानंतर पिंपरी पिंपरी-चिंचवडमधील साहित्यिकांच्या वतीने सविता इंगळे यांचा हृद्य सत्कार करण्यात आला.

प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस पुढे म्हणाले की, “‘चाकोरीतल्या जगण्यामधून’ या संग्रहातील कविता चाकोरी बाहेरच्या आहेत. यामधील कविता सूचक आहेत; तशाच स्फोटकदेखील आहेत. कर्तृत्ववान स्त्रियांशी आपल्या कवितांमधून संवाद साधत कवयित्रीने उपस्थित केलेले प्रश्न अंतर्मुख करणारे आहेत. सविता इंगळे यांच्या कविता केवळ स्त्रियांच्या व्यथांच्याच नाहीत; तर बालपणीची निरागसतासुद्धा त्यांत आहे. कोणताही जातीयवाद हा निषेधार्थ असून सांस्कृतिक सुसंवादाचा धागा ‘चाकोरीतल्या जगण्यामधून’ कवयित्रीने गुंफलेला आहे. आईला धर्म नसतो; तर आई हाच धर्म असतो, अशीही भूमिका ही कविता मांडते!”

नीता हिरवे, मल्लिकार्जुन इंगळे, वर्षा बालगोपाल, स्नेहा इंगळे, माधुरी विधाटे, मनीषा व्हटकर आणि स्वयंसिद्धा प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाच्या संयोजनात परिश्रम घेतले. दिनेश भोसले यांनी सूत्रसंचालन केले; तर ज्ञानेश्वर भंडारे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.