Pimpri news: विषय समिती सभापतीपदासाठी रस्सीखेच; इच्छुकांची नेत्यांकडे ‘फिल्डिंग’

0

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विधी, महिला व बालकल्याण, शहर सुधारणा, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक आणि शिक्षण समितीच्या सभापतीपदासाठी सत्ताधारी भाजप नगरसेवकांमध्ये चूरस निर्माण झाली आहे. शेवटचे वर्ष असल्याने विषय समितीचे सभापतीपद मिळावे यासाठी इच्छुक सदस्यांनी नेत्यांकडे ‘फिल्डिंग’ लावण्यास सुरुवात केली. दरम्यान, पालिकेची आगामी निवडणूक 14 महिन्यावर आली आहे. आताचे सभापती शेवटचे असण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नेते कोणाला सभापतीपदाची संधी देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महापालिकेच्या पाचही विषय समिती सदस्यांची मुदत संपल्याने मंगळवारी (दि. 13) झालेल्या महासभेत नवीन सदस्यांची निवड करण्यात आली. या पाचही समित्यांमध्ये नऊ सदस्य असून पक्षीय बलाबलानुसार सत्ताधारी भाजपचे पाच, राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन आणि शिवसेनेच्या एका सदस्याची प्रत्येक समिती निवड झाली.

सर्वाधिक भाजपचे नगरसेवक असल्याने भाजपचा सभापती होणार हे निश्चित आहे. सभापतीपदासाठी सोमवारी (दि.19) अर्ज दाखल करण्यात येणार आहेत.

भाजप शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे, आमदार लक्ष्मण जगताप यांच्याकडे महापालिकेची सूत्रे आहेत. ‘भाऊ, दादा बोले तशी महापालिका हाले’ अशी परिस्थिती आहे. दोघांनी सत्तेचा फॉर्मुला ठरवून घेतला आहे. दोघांच्या समर्थकांना महापालिकेत महत्वाची पदे दिली जातात.

महापालिका निवडणूक जवळ आली असून त्याच्या पार्श्वभूमीवर हे दोन्ही आमदार कोणती समिती आपल्या समर्थकांकडे ठेवतात हे पाहणे महत्वाचे आहे.

महापालिकेत स्थायी समितीनंतर विधी समिती सर्वांत महत्वाची समिती मानली जाते. विधीचे सभापतीपद सलग दोनवर्ष आमदार जगताप यांच्या समर्थकांकडे तर मागील वर्षी भाजपच्या जुन्या कार्यकर्त्या अश्विनी बोबडे यांच्याकडे होते.

यावेळी आमदार लांडगे यांच्या समर्थकाला विधीचे सभापतीपद मिळण्याची शक्यता आहे. ‘विधी’त स्वीनल म्हेत्रे, वसंत बोराटे, संगीता भोंडवे, सुजाता पालांडे, सीमा चौघुले यांची वर्णी लागली आहे. यांच्यापैकी वसंत बोराटे यांना सभापतीपद दिले जाऊ शकते. यापूर्वी त्यांनी विधी समिती सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.

महिला व बालकल्याण समितीत योगिता नागरगोजे, सविता खुळे, चंदा लोखंडे, माधवी राजापुरे, निर्मला गायकवाड यांची निवड झाली आहे. त्यापैकी कोणाच्या गळ्यात सभापतीपदाची माळ पडते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

तर, शहर सुधारण समितीतील साधना मळेकर, सोनाली गव्हाणे, अनुराधा गोरखे, सुनीता तापकीर, शारदा सोनवणे या पाचही सदस्यांनी यापूर्वी एक पद भोगले आहे. त्यामुळे आता सभापतीपद कोणाला दिले जाते याची उत्सुकता आहे.

क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीत अश्विनी जाधव, केशव घोळवे, उत्तम केंदळे, शैलेश मोरे, बाळासाहेब ओव्हाळ यांची निवड झाली आहे. त्यातून कोणाची सभापतीपदी निवड होते याकडे लक्ष आहे.

शिक्षण समितीत सारिका सस्ते, प्रियंका बारसे, मनीषा पवार, माया बारणे, तुषार कामठे यांची निवड केली आहे. सभापतीपद मिळावे यासाठी पाचही सदस्य इच्छुक आहेत. त्यातून पक्ष नेतृत्व कोणाला संधी देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

आता सभापती होणाऱ्यांना एक वर्ष मिळणार आहे. त्यांचा वर्षाचा कार्यकाळ ऑक्टोबर 2021 पर्यंत असणार आहे. पालिकेची आगामी निवडणूक फेब्रुवारी 2022 मध्ये होणे अपेक्षित आहे. 2021 मधील डिसेंबर अखेर किंवा 2022 मधील जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता लागू शकते.

त्यामुळे यंदाच हे पद मिळावे यासाठी नगरसेवक प्रयत्नशील आहेत. निवडणुकीच्या तोंडावर दोन महिन्यासाठी सभापतींची निवडणूक होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे आता निवडलेल्या सभापतींनाचा मुदतवाढ दिली जावू शकते.

पालिका निवडणुकीच्या तोंडावर समर्थक नाराज होऊ नये याची दक्षता आमदारांना घ्यावी लागणार आहे. त्यांची नाराजी आमदारांना परवडणारी नाही. त्यामुळे आमदार कोणाला सभापतीपद देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.