Pimpri News : नव्या कंत्राटाला स्थगिती ! ‘वायसीएमएच’मधील 217 कोविड योद्ध्यांना मिळाला न्याय; यशवंत भोसले यांच्या मागणीला यश

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील (वायसीएम) मधील सफाई कामाच्या उद्यापासून सुरू होत असलेल्या नवीन कंत्राटाला आयुक्त राजेश पाटील यांनी स्थगिती दिली आहे. त्यामुळे कोरोना काळात जीव धोक्यात घालून रुग्णांची सेवा करणा-या वायसीएम रुग्णालयातील चतृर्थ श्रेणीतील 217 कंत्राटी कर्मचा-यांना न्याय मिळाला आहे. यामुळे राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंत भोसले यांच्या मागणीला यश आले असून त्यांनी 217 कोविड योद्ध्यांना न्याय मिळवून दिला. नव्या कंत्राटला स्थगिती देत कोविड योद्ध्यांच्या सन्मान केल्याबद्दल भोसले यांनी आयुक्त राजेश पाटील यांचे आभार मानले.

महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयातील कॉरीडॉर, अंतर्गत, बाह्य परिसरातील रस्ते, गार्डन, डक्ट, ड्रेनेज लाईनची साफसफाई तसेच रुग्णांची सुश्रुषा, नर्सेस, डॉक्टरांना मदत आदी कामे 217 कंत्राटी कर्मचा-यांमार्फत केली जात होती. कोरोना काळात कोविड योद्धा बनून काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या 1 ऑगस्ट रोजी जाणार होत्या. जुन्या कंत्राटाच्या जागेवर श्री कृपा सर्विसेस या नवीन ठेकेदाराला वायसीएमएचमधील यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील साफसफाईचा ठेका देण्यात आला होता.

या ठेकेदाराने पूर्वीच्या 16 वर्षापासून काम करत असलेल्या बीव्हीजी या ठेकेदाराचा ठेका गेल्यामुळे त्यामध्ये काम करत असणाऱ्या व कोरोना सारख्या महामारीच्या काळात त्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता सेवा केली, अशा सफाई कर्मचारी, रुग्णांची सेवा करणाऱ्या मामा-मावश्या या सर्व कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याचा निर्णय घेतला होता.

कमी वेतन देऊन नवीन कर्मचाऱ्यांची भरती करून शिफ्ट शेड्यूल लावण्याची प्रक्रिया नवीन कंत्राटदाराने केली होती. नोकरीवर गदा येण्याची चिन्हे दिसताच 217 कर्मचाऱ्यांनी 29 जुलै रोजी राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंत भोसले यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. त्यानंतर भोसले यांनी कोरोना कालावधीत काम केलेल्या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करू नये, अद्याप कोरोनाच्या बाबतीतले निर्बंध लागू असल्याने या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करता येत नाही. त्यांचे वेतन देखील कपात करता येत नाही. तसे शासनाचे आदेश असल्याचे आयुक्त राजेश पाटील यांची भेट घेवून निदर्शनास आणून दिले.

कोरोना योद्ध्यांचा या काळात रोजगार जाऊ नये व त्यांचे वेतनही कमी होऊ नये याकरिता 1 ऑगस्ट 2021 पासून सुरु होणाऱ्या नवीन ठेकेदाराच्या कामास स्थगिती द्यावी अशी आग्रही मागणी भोसले यांनी केली होती. तसेच न्यायालयीन लढाई, रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला होता. भोसले यांच्या मागणीला आयुक्त राजेश पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन श्री कृपा सर्विसेस या ठेकेदाराच्या कामास स्थगिती दिली आहे.

त्यामुळे 217 कोविड योद्ध्यांच्या नोकऱ्या वाचविण्यात भोसले यांना यश आले आहे. नोकरी वाचलेल्या सर्व कामगारांनी भोसले यांना पुष्पगुच्छ देऊन आभार मानले व पेढे वाटले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.