Pimpri News : शहरात विजेचा खेळखंडोबा, विद्यार्थ्यांचे होतेय नुकसान

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात मागील दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव सुरु आहे. वीजपुरवठा सातत्याने खंडित होत असल्यामुळे ऑनलाइन अभ्यास करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. एका आठवड्यात वीज पुरवठा सुरळीत करावा अन्यथा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा क्रांतीकुमार कडुलकर यांनी दिला आहे.

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने याबाबत निवेदन विभागिय कार्यकारी अभियंता यांनी दिलं आहे. या निवेदनात असे म्हटले आहे की, शहरातील वीजपुरवठा सातत्याने खंडित होत असल्यामुळे ऑनलाइन अभ्यास करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांची आणि शिक्षकांची अभ्यासक्रम पूर्ण करताना तारांबळ होत आहे.

आय टी आणि सेवा क्षेत्रातील वर्क फ्रॉम होम ड्युटीतील लाखो कर्मचाऱ्यांना वरिष्ठांची नाराजी सहन करावी लागत आहे. विजेच्या खेळ खंडोब्यामुळे शहरातील हजारो सोसायट्याना पाणी उपसा वेळेवर ना झाल्यामुळे अडचणी निर्माण होत आहेत.

सतत खंडित होणाऱ्या वीज पुरावठ्यामुळे लघुउद्योगांचे आर्थिक नुकसान होत आहे. सामान्य जनता, मध्यम वर्ग, उद्योजकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे विद्यापीठाची अंतिम परीक्षा 12 ऑक्टोबर पासून सुरु होत आहे. या परीक्षेच्या काळात महावीतरणाची सेवा विस्कळीत झाली तर विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान होईल.

गेल्या तीन वर्षात 18 टक्क्यांहून अधिक वीज दरवाढ लादणाऱ्या महावितरणने स्वतःच्या ग्राहक सेवेचा दर्जा का सुधारला नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

अखंडित वीजपुरवठा सुरु करून ग्राहकांच्या अडचणी एका आठवड्यात सोडवा, अन्यथा माकप पिंपरी चिंचवड शहर समितीच्या वतीने आंदोलन करु असा इशारा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे.

माकपच्या गणेश दराडे, बाळासाहेब घस्ते, अपर्णा दराडे, क्रांतीकुमार कडुलकर, सचिन देसाई, वीरभद्र स्वामी, सुकुमार पोन्न्पन, सतीश नायर, अविनाश लाटकर, किसन शेवते, विनोद चव्हाण, संतोष गायकवाड, ख्वाजा जमखाने, संजय ओहोळ यांच्या वतीने हे निवेदन देण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.