Pimpri News: अण्णासाहेब मगर क्रीडा संकुलाच्या 10 एकर जागेत ‘पीपीपी’ तत्वावर क्रिकेट स्टेडियम विकसित करणार

एमपीसी न्यूज – नेहरुनगर येथील अण्णासाहेब मगर क्रीडा संकुलाच्या 25 एकर क्षेत्रफळापैकी 10 एकर जागेवर क्लब आणि क्रिकेट स्टेडियम पी.पी.पी. तत्वावर विकसित करण्यात येणार आहे. तसेच उर्वरीत क्षेत्र पिंपरी- चिंचवड महापालिकेमार्फत विकसित केले जाणार आहे.

पिंपरी – नेहरुनगर येथील सुमारे 25 एकर क्षेत्रफळ असलेले अण्णासाहेब मगर क्रिडा संकुल महापालिकेच्या ताब्यात आहे. पिंपरी – महापालिकेच्या वतीने हे क्रीडा संकुल विकसित करण्यात येणार आहे. हा प्रकल्प वैशिष्ट्यपुर्ण असून शहराच्या लौकिकामध्ये भर टाकणारा आहे. तसेच महापालिका क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्यासाठी अत्याधूनिक क्रीडासंकुल आणि त्या दर्जाचे प्रशिक्षण देणारे क्रीडा प्रशिक्षक त्या ठिकाणी असणे आवश्यक आहे. सद्य:स्थितीत क्रीडा संकुलाची दुरावस्था झाली आहे. त्या ठिकाणी खेळाडूंसाठी सोयीसुविधा उपलब्ध नाहीत.

हा प्रकल्प तांत्रिकदृष्ट्या योग्य आणि त्याचा दर्जा आंतरराष्ट्रीय पातळीनुसार करणे गरजेचे असल्यामुळे शशी प्रभू अ‍ॅण्ड असोसिएटस यांची या कामासाठी वास्तुविशारद म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. वास्तुविशारद शशी प्रभू अ‍ॅण्ड असोसिएटस यांनी अण्णासाहेब मगर क्रीडा संकुलाचा एकत्रित आराखडा तयार केला आहे. त्याचे सादरीकरण महापौर उषा ढोरे, आयुक्त राजेश पाटील आणि इतर महापालिका पदाधिकाऱ्यांसमोर स्थायी समिती सभागृहात करण्यात आले. संपूर्ण क्रीडा संकुलाचा मास्टर प्लॅन तयार करावा. क्लब आणि क्रिकेट स्टेडियम बांधा, वापरा आणि हस्तांतरीत करा (पी.पी.पी.) तत्वावर विकसित करण्याबाबत विनंती प्रस्ताव (आर.एफ.पी.) प्रसिद्ध करावा.

उर्वरित काम टप्प्याटप्प्याने महापालिकेमार्फत करण्यात यावे, असा निर्णय या सादरीकरणा दरम्यान घेण्यात आला होता. त्यानुसार, नेहरुनगर येथील अण्णासाहेब मगर क्रिडा संकुल विकसित करण्यासाठी 25 एकर क्षेत्रफळापैकी 10 एकर क्षेत्रफळावर क्लब आणि क्रिकेट स्टेडियम पी.पी.पी. तत्वावर विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या क्रीडा संकुलाचे उर्वरित क्षेत्र महापालिकेमार्फत विकसित करण्यात येणार आहे. महापालिका सभेत या विषयाला उपसचुनेसह मंजुरी देण्यात आली.

प्रकल्पाचे वैशिष्ट्ये!
# क्रीडासंकुलाचे काम पी.पी.पी. तत्वावर राबविण्यात येणार आहे.
# प्रकल्प राबविण्यासाठी महापालिकेला कोणत्याही प्रकारचा खर्च करावा लागणार नाही.
# प्रकल्पाचे बांधकाम पुर्ण करावयाची मुदत 30 महिने आहे.
# 30 ते 40 वर्षानंतर प्रकल्प महापालिकेस विनाअट, कोणत्याही दायित्वाशिवाय हस्तांतरित केला जाणार आहे.

# प्रकल्पाचा संपूर्ण खर्च विकसकाने करावयाचा आहे.
#प्रकल्प महापालिकेकडे हस्तांतरित करेपर्यंत देखभाल आणि दुरुस्तीचा खर्च देखील विकसकानेच करायचा आहे.
# विकसकाला प्रकल्पामधून प्राप्त होणाऱ्या उत्पन्नाचा काही हिस्सा तसेच भाडे महापालिका घेणार.
# महापालिकेकडून नामांकित केलेल्या काही खेळाडूंना मोफत प्रशिक्षण विकसकाने द्यावे.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.