Pimpri News: पोटनिवडणुकीसाठी मतदार यादी तयार करा, निवडणूक आयोगाचे महापालिकेला आदेश

12 मार्च रोजी प्रसिद्ध होणार मतदार याद्या, 15 जानेवारीपर्यंतची अद्यावत मतदार यादी वापरणार

एमपीसी न्यूज – कोरोनामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेतील निधन झालेल्या तीन नगरसेवकांच्या रिक्त जागेवरील पोटनिवडणुका घेण्यासाठी मतदार यादी तयार करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाचे प्रभारी सचिव अविनाश सणस यांनी महापालिकेला दिले आहेत.

भारत निवडणूक आयोगाकडून 15 जानेवारी 2021 पर्यंत अद्यावत केलेली विधानसभेची मतदार यादी वापरण्यात येणार आहे. अंतिम प्रभागनिहाय व मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या अधिप्रमाणित करुन 12 मार्च 2021 रोजी प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. त्यानंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल.

प्रभाग क्रमांक 1 चिखली मधून निवडून आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दत्ता साने यांचे कोरोनामुळे 4 जुलै 2020 रोजी, प्रभाग क्रमांक 14 काळभोरनगर, चिंचवड स्टेशन, दत्तवाडी प्रभागातून निवडून आलेले राष्ट्रवादीचे नगरसेवक जावेद शेख यांचे कोरोनामुळे 31 जुलै 2020 रोजी आणि प्रभाग क्रमांक चार दिघी-बोपखेलमधून निवडून आलेले भाजपचे लक्ष्मण उंडे यांचे 26 सप्टेंबर 2020 रोजी कोरोनामुळे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागी पोटनिवडणूक होणार आहे.

….असा आहे निवडणूक याद्या प्रसिद्ध करण्याचा कार्यक्रम

या निवडणुकांकरिता भारत निवडणूक आयोगाने 15 जानेवारी 2021 पर्यंत प्रसिद्ध केलेल्या यादीच्या आधारे प्रभागनिहाय मतदारांचे विभाजन करण्याची कारवाई केली जाणार आहे. प्रभागनिहाय प्रारुप मतदार यादी 16 फेब्रुवारी 2021 रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. प्रारुप मतदार यादीवरील हरकती व सूचना 16 ते 23 फेब्रुवारीपर्यंत दाखल करता येणार आहेत.

प्रभानिहाय अंतिम मतदार यादी 3 मार्च रोजी तर मतदान केंद्राची यादी 8 मार्च रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. अंतिम प्रभागनिहाय व मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या 12 मार्च 2021 रोजी अधिप्रमाणित करुन प्रसिद्ध केल्या जाणार आहेत.

महापालिका आयुक्तांनी विधानसभेच्या मतदार याद्यांचे विभाजन राज्य निवडणूक आयोगाने महाऑनलाईनच्या माध्यमातून उपलब्ध करुन दिलेल्या संगणक प्रणालीमार्फत करणे आवश्यक आहे. प्रभानिहाय प्रारुप मतदार यादीतील मतदारांची संख्या समान आहे, याची खातरजमा करावी. दुबार नावांसमोर विशिष्ट चिन्हे करुन अशा मतदारांच्या ओळखीचे पुरावे काटेकोरपणे तपासावेत.

_MPC_DIR_MPU_II

एका मतदान केंद्रास 700 ते 800 मतदार जोडणार

प्रभागनिहाय मतदार यादीला हरकती व सूचना मागविण्यासाठी व्यापक प्रसिद्धी द्यावी. सूचनांची दखल घेवून यादी अंतिम करावी. अंतिम याद्या सर्व राजकीय पक्ष, उमेदवार, सर्व सर्च इंजिन, टु व्होटर, महाव्होटर, मतदान केंद्राध्यक्ष, मतदान प्रतिनिधी यांना उपलब्ध करुन द्याव्यात.

मतदान केंद्रनिहाय मतदार यादीस महापालिका मुख्य कार्यालय, प्रभाग समिती, सूचनाफलक, संकेतस्थळ, वृत्तपत्रत प्रसिद्धी द्यावी. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक मतदान केंद्रास 700 ते 800 मतदार जोडण्यात येणार आहेत.

आदर्श मतदान केंद्र स्थापन करावे

महापालिकेतील शक्यतो सर्व मतदान केंद्रे ही आदर्श असणे आवश्यक आहे. यासाठी आयोगाच्या सूचनांप्रमाणे काटेकोरपणे अंमलबजावणी होणे आवश्यक राहील. मतदान केंद्र तळजमल्यावर असावीत. केंद्राचे क्षेत्रफळ कमीत कमी 20 चौरस मीटर असावे. प्रवेशासाठी आणि बाहेर पडण्यासाठी स्वतंत्र दरवाजे असावेत. विद्युत, पिण्याचे पाणी, स्वतंत्र पुरुष-त्री प्रसाधनगृह असावे. सावलीची व्यवस्था करण्यात यावी. दिव्यांग मतदारांसाठी रॅम्प, व्हील चेअर उपलब्ध असावी.

निवडणूक बिनविरोध होणार ?

कोरोनामुळे राष्ट्रवादीचे दत्ता साने, जावेद शेख आणि भाजपचे लक्ष्मण उंडे या तीन नगरसेवकांचे निधन झाले आहे. दोन राष्ट्रवादी आणि एका भाजप नगरसेवकांचा कोरोना महामारीने बळी घेतला आहे. पोटनिवडणुकीत सहानभुतीची लाट असते. निधन झालेल्या नगरसेवकांच्या कुटुंबातील सदस्याला उमेदवारी देवून बिनविरोध निवडून आणण्याचा विचार होवू शकतो.

महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता आहे. काटावरचे बहुमत नाही. मार्च महिन्यात निवडणूक होणार आहे. त्यामुळे केवळ सहा महिन्याचा कालावधी मिळणार आहे. त्यासाठी पोट निवडणूक बिनविरोध होवू शकते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.