Pimpri News: महात्मा गांधींना अपेक्षित असलेले कार्य पंतप्रधान नरेंद्र मोदी समर्थपणे करत आहेत – अमित गोरखे

एमपीसी न्यूज – राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अपेक्षित असलेले कार्य आत्मनिर्भर भारत या योजनेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी समर्थपणे करत आहेत, असे भाजपचे प्रदेश सचिव अमित गोरखे यांनी म्हटले आहे. प्रत्येकाने आत्मनिर्भर भारत या संकल्पनेशी स्वतःला जोडून देश सेवा म्हणून स्वच्छतेचे काम आजपासून करणे महत्त्वाचे आहे, असेही ते म्हणाले.

नगरसेविका अनुराधा गोरखे यांच्या मार्गदर्शनाखाली उपमहापौर तुषार हिंगे, नगरसेवक केशव घोळवे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रभाग क्रमांक दहा दत्तनगर विद्यानगर परिसरामध्ये महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. याप्रसंगी परिसरातील अनेक महिला नागरिक या मोहिमेत सहभागी झाले होते.

याप्रसंगी बोलताना अमित गोरखे म्हणाले “परमपूज्य महात्मा गांधी व भारतरत्न लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टीच्या वतीने देशभर या सेवा सप्ताहाचे आयोजन केले गेले आहे. महात्मा गांधी यांना अपेक्षित असलेले काम आत्मनिर्भर भारत या मोहिमेतून पंतप्रधान मोदी सक्षमपणे करत आहेत. आजच्या प्रसंगी महात्मा गांधी यांना स्मरून जागोजागी स्वच्छता करणे हे भारतातील प्रत्येक नागरिकाचे आद्य कर्तव्य आहे.

प्रत्येकाने आत्मनिर्भर भारत या संकल्पनेशी स्वतःला जोडून देश सेवा म्हणून स्वच्छतेचे काम आजपासून करणे महत्वाचे आहे. स्वच्छता ही फक्त आपल्या घराची न ठेवता सामाजिक स्वच्छता ही अंगीकारणे हे आपले परमकर्तव्यच आहे. महात्मा गांधी यांना अपेक्षित असलेला भारत खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर भारता या संकल्पनेतून उभा राहू शकेल”.

उपमहापौर तुषार हिंगे यांनी महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांचे स्मरण करून आदरांजली वाहिली.

प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे सूर्यकांत मोहिते, रुपेश सुपे, अजित भालेराव, नंदा करे, किशोरी हरणे, अलका सूर्यवंशी,पालिकेचे अधिकारी शिंदे साहेब उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.