Pimpri News: पंतप्रधान आवासचा आराखडा तयार करणाऱ्या एजन्सीला मुदतवाढ; पावणे दोन कोटींचा खर्च

एमपीसी न्यूज – पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत प्रकल्पांसाठी कृती आराखडा आणि वार्षिक अंमलबजावणी आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी नेमणूक केलेल्या एजन्सीला आणखी दोन वर्षांसाठी कामकाज देण्यात येणार आहे. त्यापोटी त्यांना 1 कोटी 70 लाख रुपये देण्यात येणार आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत शहरात सर्वांसाठी घरे कृती आराखडा आणि वार्षिक अंमलबजावणी आराखडा तयार करून शहरस्तरीय तांत्रिक कक्ष स्थापन केला आहे. या अभियानाअंतर्गत क्रीसिल रिस्क अ‍ॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर सोल्युशन्स लिमिटेड यांची आराखड्याची अंमलबजावणी करण्याकरिता नेमणूक केली आहे. त्यांचे संपूर्ण काम स्थापत्य प्रकल्प विभागाच्या नियंत्रणात करण्यास मान्यता दिली आहे. क्रीसिल यांची या कामाची मुदत 7 जानेवारी 21 रोजी संपली. मात्र, हे काम प्रगतिपथावर असल्याने त्यांना सहा महिने मुदतवाढ देण्यात आली.

क्रीसिलमार्फत या प्रकल्पासाठी केंद्र व राज्य सरकारकडून अनुदान प्राप्त होण्यासाठी पाठपुरावा करणे, उपयोगिता प्रमाणपत्र सादर करणे, सरकारशी पत्रव्यवहार आदी कामे करण्यात येतात. तथापि, पंतप्रधान आवास योजनेंतर्गत प्रकल्पांची कामे यापुढेही चालू राहणार असल्याने या कामासाठी सल्लागार नेमणूक करण्याकरिता निविदा काढण्यास मान्यता देण्यात आली. महापालिकेमार्फत नव्याने निविदा प्रक्रिया सुरू होती. मात्र, मूळ निविदेसह दोन वेळा मुदतवाढ देऊनही क्रीसिल यांचीच एक निविदा प्राप्त झाली. त्यामुळे त्यांनाच पुन्हा हे काम देण्याचे ठरले. क्रीसिल हे पात्र सल्लागार ठरल्याने 15 जून 21 रोजी त्यांच्या निविदेचे पाकीट उघडले. त्यात क्रीसिल यांनी 1 कोटी 90 लाख 80 हजार रुपये इतका दर सादर केला आहे. त्यांना दर कमी करण्याबाबत विचारणा केली असता त्यांनी 24 महिन्यांसाठी जीएसटी व सर्व करांसह सुधारित 1 कोटी 70 लाख रुपये इतका दर सादर केला. त्यानुसार, त्यांचा दर स्वीकृत केला असून, त्यांच्यासमवेत करारनामा करण्यात येणार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.