Pimpri News: पंतप्रधान आवास योजना सोडतीचा कार्यक्रम रद्द

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत च-होली, रावेत आणि बो-हाडेवाडी येथे आर्थिकदृष्या दुर्बल घटकातील नागरिकांसाठी बांधण्यात येणा-या सदनिकांच्या सोडतीचा कार्यक्रम अचानक रद्द करण्यात आला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सोडत काढली जाणार होती. परंतु, अचानक सोडतीचा कार्यक्रम रद्द झाला आहे.

चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आज (सोमवारी) दुपारी तीन वाजता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सोडत काढली जाणार होती. त्यासाठी दुपारपासून नागरिक जमा झाले होते. महापौर उषा ढोरे, भाजप शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे यांच्यासह भाजप पदाधिकारी उपस्थित होते.

पुण्याचे पालकमंत्री असताना चंद्रकांत पाटील यांनी पिंपरी-चिंचवड शहरासाठी कोणतेही विकास काम केले नसल्याचा आरोप करत त्यांच्या हस्ते पंतप्रधान आवास योजनेच्या सोडतीला राष्ट्रवादी काँग्रेसने विरोध केला. त्याविरोधात चिंचवड येथे निदर्शने केली. काळे झेंडे हातात घेऊन भाजपच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली होती.

साडेचारच्या सुमारास अचानक सोडतीचा कार्यक्रम रद्द झाल्याचे जाहीर करण्यात आले. त्यामुळे सोडतीसाठी आलेले नागरिक परत गेले. दरम्यान, सोडतीचा कार्यक्रम नेमका कशावरून रद्द झाला, याबाबत जोरदार चर्चा रंगली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.