Pimpri News: ‘खासगी रुग्णालये बिलासाठी तुमची अडवणूक करताहेत; येथे संपर्क साधा, तुमची समस्या सुटेल’

पिंपरी-चिंचवडमधील खासगी रुग्णालये आजही गोरगरीब रुग्णांची बिलांसाठी नाहक पिळवणूक करत असल्याच्या असंख्य तक्रारी प्राप्त होत आहेत.

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडमधील खासगी रुग्णालयांकडून कोरोना रुग्णांवर उपचार केल्यानंतर बिलांसाठी रुग्णांची अद्यापही पिळवणूक सुरूच आहे. त्यामुळे कोणत्याही खासगी रुग्णालयांकडून बिलांसाठी पिळवणूक आणि अडवणूक होत असेल, तर शहरातील नागरिकांनी डॉ. सतीश कांबळे (7507411111) यांच्याशी तसेच [email protected] या ई-मेलवर संपर्क साधावा, असे आवाहन आमदार लक्ष्मण जगताप यांनी केले आहे. येथे संपर्क केल्यानंतर संबंधित नागरिकांची बिलांसंदर्भात असणाऱ्या तक्रारीचे निश्चितपणे समाधान केले जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

यासंदर्भात आमदार लक्ष्मण जगताप यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, “शासनाने कोविड-19 साथ रोगाच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी, कोरोना विषाणू कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 13 मार्च 2020 पासून लागू केल्याची अधिसूचना निर्गमित केलेली आहे.

राज्य आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 व भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम 1897 अंतर्गत राज्यात कोरोना विषाणू या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध व नियंत्रण करण्यासाठी महाराष्ट्र कोविड-19 उपाययोजना नियम 2020 अंमलात आले आहे. या कायद्यानुसार कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी व जिवितहानी टाळण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

त्यामध्ये खासगी रुग्णालयांना काही निर्बंध लागू करण्यात आले आहेत. तसेच कोरोना आजार आणि अन्य आजारांवर उपचार केल्यानंतर किती खर्च घेण्यात यावा, हेही या कायद्यात सुस्पष्ट करण्यात आलेले आहे. त्यानुसार खासगी रुग्णालयांनी रुग्णांकडून उपचार खर्च घेणे कायद्याने बंधनकारक आहे.

मात्र, पिंपरी-चिंचवडमधील खासगी रुग्णालये आजही गोरगरीब रुग्णांची बिलांसाठी नाहक पिळवणूक करत असल्याच्या असंख्य तक्रारी प्राप्त होत आहेत. अनेकजण खासगी रुग्णालयांकडून होणाऱ्या पिळवणुकीला बळी पडून आपली आयुष्यभराची जमा केलेली पुंजी लूट चालविलेल्या रुग्णालयांकडे सुपूर्द करत आहेत. त्यामुळे अशा गोरगरीब रुग्णांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.

ही लूट होऊ नये आणि गोरगरीब रुग्णांचे हक्क अबाधित राहावेत यासाठी शहातील कोणत्याही खासगी रुग्णालयात बिलांसाठी पिळवणूक किंवा अडवणूक होत असेल, तर संबंधित नागरिकांनी डॉ. सतीश कांबळे (7507411111) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आमदार लक्ष्मण जगताप यांनी केले आहे.

तसेच [email protected] या ई-मेलवर मेल केल्यास तुमच्याशी तुरंत संपर्क साधून समस्या जाणून घेण्यात येईल. संपर्क केलेल्या नागरिकांनी रुग्णालयांसाठी बिलासंदर्भात केलेल्या तक्रारीचे निश्चितपणे समाधान केले जाईल, असे आश्वासन आमदार जगताप यांनी दिले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.