Pimpri News: खासगी रुग्णालयांनी बेडची माहिती वॉररुमकडे द्यावी; अन्यथा कारवाई : आयुक्त

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना रुग्णांवर उपचार करणा-या खासगी रुग्णालयांनी दररोज बेडची माहिती महापालिका वॉररुमकडे सादर करावी. माहिती न देणा­-या खासगी रुग्णालयावर कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी प्रशासनास दिले आहेत.

शहरातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता महापौर ऊषा ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली आयुक्त दालनात आज (मंगळवारी) बैठक झाली. उपमहापौर ‍हिराबाई उर्फ नानी घुले, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती नितीन लांडगे, नगरसेवक संतोष कांबळे, सतिश कांबळे, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, वायसीएमचचे अधिष्ठता डॉ. राजेश वाबळे आदी उपस्थित होते.

शहरातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता बेडची उपलब्धता कमी पडत आहे. खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांसाठी राखीव बेड ठेवण्यात आले आहेत. परंतु, खासगी रुग्णालयातील बेडची माहिती उपलब्ध होत नसल्याने रुग्णांची तारांबळ होत असल्याचे निदर्शनास येत आहे. खासगी रुग्णालयांनी वेळीच डॅशबोर्ड अपडेट करावेत, अशा सूचना महापौर ढोरे यांनी आयुक्त राजेश पाटील यांना केल्या.

आमदार लक्ष्मण जगताप यांचे प्रतिनिधी डॉ. सतिष कांबळे यांनी कोरोना रुग्णांना भेडसावणा­-या समस्या, महापालिका हॉस्पिटल, शासकीय रुग्णालय, खासगी हॉस्पिटलमधील कोरोना रुग्णांच्या उपचारार्थ उपाययोजना व भविष्यात लागणारे बेड, ऑक्सिजन, व्हेटिलेटर आदींची त्वरित उपलब्धता व्हावी. जास्तीत जास्त नागरिकांना कोव्हिशिल्ड लसीकरण करून घेण्यासाठी लसीकरण केंद्र वाढविण्यात यावे. कोवीड ॲब्युलन्स, लागणारे डॉक्टर इत्यादी विषयावर चर्चा केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.