Pimpri News: कोरोनाकाळात खासगी शिक्षण संस्था चालकांचा फी वसुलीसाठी तगादा; पालकांचे खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडे गाऱ्हाणे

एमपीसी न्यूज – कोरोना महामारीच्या काळात सर्व सामान्य नागरिकांना जगणे कठीण झाले आहे. अनेकाच्या नोक-या गेल्या आहेत. तर, काहीच्या हाताला काम मिळेना. यातच शाळेची फी भरणे देखील कठीण झाले आहे. खासगी शिक्षण संस्था चालकांकडून फी वसुलीसाठी तगादा लावला जात आहे. या पार्श्वभूमीवर पिंपळे सौदागर येथील पालकांनी खासदार श्रीरंग बारणे यांची भेट घेवून शिक्षण संस्था चालकांनी विद्यार्थ्यांची फी कमी करण्याची मागणी केली.

पिंपरी-चिंचवड शहरात अनेक शिक्षण संस्था आहेत. यातील अनेक संस्थाची वार्षिक फी लाखाच्यावर आहे. सर्वसामान्य नागरिकांना फी भरणे कठीण झाले आहे. फी भरली नाही. तर, विद्यार्थ्यांना शाळेतून काढण्याची धमकी दिली जाते. या पार्श्वभूमीवर खासदार श्रीरंग बारणे यांची पिंपळे सौदागर येथील पालकांनी भेट घेवून आपल्या व्यथा मांडल्या.

ऑनलाईन पद्धतीने दिले जाणारे शिक्षण हे परिणामकारक नाही. ज्या मुलांनी फी भरली नाही. त्या मुलाकडे लक्ष दिले जात नाही. फी भरली नाही. तर विद्यार्थ्यांना शाळेतून काढण्याची धमकी संस्था चालक देतात. विद्यार्थी शाळेत जात नाही तरी क्रीडा, वाचनालय, कंम्प्युटर, म्युझीक या सारखे व इतर शैक्षणिक शुल्क आकारले जाते.

पहिली ते तिसरी मधील विद्यार्थ्यांना ऑनलाईन क्लासमध्ये काय शिकवतात हेच कळत नाही. एकूणच शिक्षणाचा खेळखंडोबा झाला असून या परिस्थितीत काही शिक्षण संस्था चालक फी वसूलीचा तगादा लावत आहे. अशा परिस्थितीत काही प्रमाणात शाळांनी विद्यार्थ्यांना फी मध्ये सवलत द्यावी, अशी मागणी पालकच्या शिष्टमंडळाने केली.

खासदार बारणे यांनी सर्व पालकांचे म्हणणे ऐकून घेऊन शिक्षण संस्था चालकाबरोबर तसेच शिक्षण अधिका-या बरोबर चर्चा करून योग्य ते सहकार्य करण्याचे आश्वासन पालकांना दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.