Pimpri News: प्रभागातील समस्या, प्रलंबित कामांसाठी निधी द्या; राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची आयुक्तांकडे मागणी

एमपीसी न्यूज – महापालिकेत भाजपची सत्ता आल्यापासून भाजप पदाधिका-यांनी पक्षीय राजकारण करीत ज्या प्रभागामध्ये राष्ट्रवादीचे जास्त नगरसेवक निवडून आले आहेत. त्या प्रभागामध्ये जाणून बजून अंदाजपत्रकामध्ये विकास कामांसाठी जुजबी तरतूद करत आहेत. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात प्रभागातील समस्या, प्रलंबित कामांसाठी निधी द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी महापालिका प्रशासनाकडे केली.

महापालिका आयुक्तांनी सन 2021-22 चा अर्थसंकल्प नुकताच स्थायी समितीसमोर सादर केला आहे. स्थायी समितीने त्यात काही बदल सुचवून महापालिकेकडे मंजुरीसाठी शिफारस केलेली आहे.

त्या अनुषंगाने आज (सोमवारी) चिंचवड स्टेशन येथील ॲटो क्लस्टर सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक आणि आयुक्त राजेश पाटील, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, उल्हास जगताप यांची बैठक झाली.

विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर, माजी महापौर मंगला कदम, वैशाली घोडेकर, अजित गव्हाणे, नाना काटे, वैशाली काळभोर, स्वाती काटे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी त्यांच्या प्रभागातील समस्या, प्रलंबित व प्रस्तावित विकासकामे, त्यासाठी लागणारा निधी याबाबत आयुक्तांसोबत सविस्तर चर्चा केली. आयुक्त पाटील यांनी सर्वांच्या समस्या एकूण घेऊन त्याबाबत लवकरच योग्य तो निर्णय घेऊ असे आश्वासन दिले.

प्राधान्याने पाणी पुरवठ्याची समस्या सोडवून पुढील सात ते आठ महिन्यात दररोज पुरेशा दाबाने पाणी पुरवठा करण्याचे आश्वासन दिले.

महापालिकेची प्रत्येक निविदा पारदर्शीपणे काढणार – आयुक्त पाटील

शहरातील नद्या दोन वर्षात स्वच्छ केल्या जातील. जलपर्णीची समस्या कायमची निकालात काढली जाईल. महापालिकेची प्रत्येक निविदा पारदर्शीपणे काढणार आहे. करदात्यांच्या पैशाचा योग्य विनियोग करण्यात येईल. अनावश्यक कामे थांबविली जातील, असेही आयुक्त पाटील यांनी सांगितले.

विरोधी पक्षनेते राजू मिसाळ म्हणाले, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना त्यांच्या प्रभागात विकास कामांसाठी पुरेसा निधी उपलब्ध व्हावा. त्याचप्रमाणे त्यांच्या प्रभागातील प्रलंबित विकासकामे व प्रस्तावित विकासकामे याबाबत आयुक्त व वरीष्ठ अधिकारी यांच्याबरोबर सविस्तर चर्चा करुन ठोस निर्णय घेण्यासाठी बैठक घेण्याची मागणी नगरसेवकांनी केली होती. त्यानुसार बैठक झाली. नगरसेवकांनी आपल्या प्रभागातील समस्या मांडल्या. त्यावर आयुक्तांनी लवकरच योग्य तो निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.