Pimpri News: भाजपकडून फसवणुकीसारख्या आर्थिक गुन्ह्याचे समर्थन करत अपप्रचार; कारवाईची मागणी 

उपमुख्यमंत्र्यांची बदनामी करणाऱ्यांवर कारवाई करण्याची राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाची पोलीस आयुक्तांकडे मागणी

एमपीसी न्यूज – भाजप नगरसेवकाविरोधात प्राधिकरणाकडून देण्यात आलेली तक्रार आणि पोलिसांकडून झालेली कारवाई या प्रकरणाशी राष्ट्रवादी काँग्रेसचा किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कोणताही संबध नाही. ही कारवाई पूर्णपणे प्रशासकीय स्वरुपाची आहे. फसवणुकीसारख्या आर्थिक गुन्ह्याचे समर्थन करत भाजपकडून बदनामी, अपप्रचार सुरु आहे. अजित पवार यांच्याबाबत भाजपचे नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते बदनामीकारक मजकूर विविध माध्यमातून प्रसिद्ध करीत असल्याचे निदर्शनास आले असून त्यांच्यावर तातडीने कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्तांकडे केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे‌ पाटील यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची भेट घेऊन निवेदन दिले. कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, माजी विरोधी पक्षनेते नाना‌ काटे, ज्येष्ठ नगरसेवक अजित गव्हाणे, नगरसेवक विक्रांत‌ लांडे, युवक कार्याध्यक्ष योगेश गवळी, अमित लांडगे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण प्रशासनाने दिलेल्या तक्रारीनुसार भोसरी पोलीस ठाण्यात भाजपचे नगरसेवक राजेंद्र किसनराव लांडगे यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. प्राधिकरणाची जागा परस्पर विक्री करून फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या प्रकरणी राजेंद्र लांडगे यांना अटक करण्यात आली आहे. परंतु, त्यांच्या अटकेनंतर भाजपच्या वतीने सोशल मिडियावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याविषयी अपप्रचार केला जात आहे. ही बाब गंभीर स्वरुपाची आहे.

भाजप नगरसेवक यांच्या विरोधात प्राधिकरणाकडून देण्यात आलेली तक्रार आणि पोलिसांकडून झालेली कारवाई या प्रकरणाशी राष्ट्रवादी काँग्रेसचा किंवा आमच्या नेते अजितदादा पवार यांचा कोणताही संबध नाही. ही कारवाई पूर्णपणे प्रशासकीय स्वरुपाची आहे. तरी, देखील फसवणुकीसारख्या आर्थिक गुन्ह्याचे समर्थन करत भाजपकडून बदनामी, अपप्रचार सुरु आहे. या पद्धतीने बदनामीकारक मजकूर विविध माध्यमातून भाजपचे नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते प्रसिध्द करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यांच्यावर तातडीने कायदेशीर कारवाई करावी.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.