Pimpri News: 18 वर्षांवरील लसीकरणाचे योग्य नियोजन करा; आमदार अण्णा बनसोडे यांची आयुक्तांना सूचना

एमपीसी न्यूज – 18 वर्षांवरील सर्वांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिम महाराष्ट्र दिनापासून म्हणजेच 1 मे पासून सुरु होत आहे. त्यामुळे प्रशासन तथा लसीकरण यंत्रणेवर मोठा ताण येणार असल्याने या मोहिमेचे व त्यासाठी लागणाऱ्या मनुष्यबळाचे योग्य ते नियोजन करण्याची सूचना राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी महापालिका प्रशासनाला केली. त्यासंदर्भात महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना पत्र पाठविले आहे.

या लसीकरण मोहिमेसाठी शहरातील खासगी रुग्णालयांची मदत घेण्याची सुचना आमदार बनसोडे यांनी केली आहे. या खासगी  रुग्णालयांच्या यंत्रणेचा वापर या मोहिमेसाठी होऊ शकतो. सध्या 45 वर्षावरील हे लसीकरण सुरु आहे. तर,  येत्या 1 तारखेपासून शहरातील लोकसंख्येत बहूतांश असलेल्या 18 वर्षावरील घटकालाही लस दिली जाणार आहे. त्यामुळे लसीकरण केंद्र व तेथील मनुष्यबळ वाढवावे लागणार आहे. सध्या पालिकेची 55 तर खासगी 11 अशा 65 केंद्रात ही लस दिली जात आहे.

आतापर्यंत फ्रंटलाईन वर्करसह 45 वर्षावरील अशा एकूण तीन लाख 68 हजार 410 नागरिकांना ती दिली गेली आहे. मात्र, 25 लाखांच्या शहरात व त्यात साठटक्यांहून अधिक असलेल्या तरुणाईला ती आता दिली जाणार आहे. त्यासाठी लसीकरण यंत्रणेवर मोठा ताण येणार आहे. तो येऊ नये तसेच सुरक्षितरित्या ही मोहीम पार पडावी म्हणून तिचे व त्यातही अधिकचे मनुष्यबळ व केंद्रांचे योग्य नियोजन करावे, अशी सूचना आमदार बनसोडे यांनी पालिका आयुक्तांना केली आहे. त्यामुळे गर्दी होणार नाही आणि मोहीम वेळेत फत्ते होईल,असे त्यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.