Pimpri News: महापालिका हद्दीतील 2281 माजी सैनिकांचा मालमत्ताकर माफ !

महाविकास आघाडी सरकारचा निर्णय

एमपीसी न्यूज – देशासाठी सर्वस्व अर्पण करणा-या माजी सैनिकांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालमत्ता करातून माफी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्यातील महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे.

‘शिवसेनाप्रमुख स्वर्गिय बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक आणि त्यांच्या विधवा पत्नीला मालमत्ता कर माफी’ या योजनेअंतर्गत ही सवलत दिली जाणार आहे. पिंपरी – चिंचवड महापालिका क्षेत्रातील 2 हजार 281 माजी सैनिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

माजी सैनिकांनी देशासाठी प्राणाची बाजी लावून जीवाची पर्वा न करता निस्वार्थीपणे देशाचे संरक्षण केले आहे. त्यांनी केलेली देशसेवा विचारात घेऊन त्यांचे मनोबल उंचावण्यासाठी आणि उचित सन्मान देण्याच्या दृष्टीकोनातून मालमत्ता करात सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागरी क्षेत्रातील महाराष्ट्र महापालिका अधिनियम 1949, मुंबई महापालिका अधिनियम 1988 व महाराष्ट्र नगर परिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 मध्ये याबाबत तरतुदी करण्यात आल्या आहेत.

यापूर्वी 5 एप्रिल 2016 रोजी नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रात राहणा-या केवळ संरक्षण दलातील शौर्यपदक धारकांना आणि माजी सैनिकांच्या विधवा पत्नीच्या नावावर असलेल्या मालमत्तांना करातून सूट देण्यात आली होती. त्यानंतर 9 जानेवारी 2017 रोजी संरक्षण दलातील अविवाहित शहिद झालेल्या सैनिकाच्या नामनिर्देशित मालमत्तांना मालमत्ता करातून सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

आता विविध स्तरातून होणारी मागणी लक्षात घेऊन 9 सप्टेंबर रोजी राज्याच्या नगर विकास विभागाने ‘शिवसेनाप्रमुख स्वर्गिय बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक आणि त्यांच्या विधवा पत्नीला मालमत्ता कर माफी’ या योजनेअंतर्गत माजी सैनिकांना मालमत्ता करातून सुट देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, महापालिका, नगरपालिका अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रात राहणा-या राज्यातील माजी सैनिक कुटुंबांना मालमत्ता करातून सूट दिली जाणार आहे.

या योजनेचा राज्यातील सुमारे अडीच लाख कुटुंबांना लाभ होणार आहे. या करमाफीस पात्र ठरणा-या व्यक्तीने जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहणार आहे.

पिंपरी – चिंचवड महापालिका हद्दीत माजी सैनिकांची संख्या 2 हजार 269 तर शौर्यपदक धारकांची संख्या 12 आहे. या सर्वांना मालमत्ताकर माफ होणार आहे. सन 2019-20 या आर्थिक वर्षात 1 कोटी 73 लाख 650 रुपयांचा मालमत्ताकर माजी सैनिकांनी भरला आहे. तर, त्यांना 45 लाख 83 हजार 370 रुपयांची सवलत मिळाली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.