Pimpri News: कचरामुक्त स्पर्धेच्या ‘पंचतारांकित’ दर्जासाठी पालिका केंद्राकडे पाठविणार प्रस्ताव

मागीलवर्षी नाकारला होता 'पंचतारांकित' दर्जा

एमपीसी न्यूज – केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ‘गार्बेज फ्री सिटी’ (कचरामुक्त) स्पर्धेतील पंचतारांकित (फाइव्ह स्टार रेटिंग) साठीचे सर्व नियम पिंपरी-चिंचवड पालिका पूर्ण करत आहे. त्यामुळे शहराला ‘गार्बेज फ्री सिटी’ स्पर्धेत ‘पंचतारांकित’ दर्जा मिळावा यासाठी पालिका केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविणार आहे. त्यासाठी महासभेची मान्यता घेतली जाणार आहे. त्याबाबतचा प्रस्ताव येत्या 8 डिसेंबर रोजी होणा-या महासभेसमोर ठेवण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून स्वच्छ भारत मोहिमेंतर्गत दरवर्षी स्वच्छ सर्वेक्षणासाठी देशातील मोठ्या शहरांमध्ये स्पर्धा घेतली जाते. मागील वर्षीपासून त्यात कचरामुक्त शहरांसाठी मानांकनाचा समावेश केला होता. फाइव्ह स्टार, थ्री स्टार आणि वन स्टार अशा तीन स्वरूपात त्याची वर्गवारी करण्यात आली होती. देशभरातील शहरे त्यामध्ये सहभागी होतात. या रेटिंगसाठी कचरा प्रक्रिया, संकलन, वर्गीकरण 100 टक्के बंधनकारक करण्याचे निकष असतात. नदी, नाले, शहरातील तलाव यांची स्वच्छता, उपाययोजनांचा समावेश असतो.

स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत पिंपरी-चिंचवड शहरास पाच तारांकित नामांकन (फाइव्ह स्टार रँकींग) कचरा मुक्त शहर (गारबेज फ्री सिटी) यासाठी पालिका करिता काम करत आहे. केंद्र सरकारने केलेल्या नियमावली, मार्गदर्शक सुचना व कार्यपद्धतीनुसार उपाययोजना केल्या जात आहेत.

शहरातील घरोघरी कचरा संकलन करणे, घरोघरी कच-याचे वर्गीकरण करणे, कच-याची वाहतूक, प्रक्रिया करण्याकरिता केलेली व्यवस्था, गटर, नाले व सार्वजनिक स्वच्छता, स्वच्छता अॅपचा वापर, प्लास्टिक बंदी कार्यवाही तसेच 500 टीपीडीचे मॅकेनिकल कंपोस्ट प्लॉन्ट, 30 टीपीडी वर्मी कंपोस्ट प्लॉन्ट, 5 टीपीडी प्लास्टीक टू फ्युअलची व्यवस्था केलेली आहे.

पिंपरी-चिंचवड शहर पाच तारांकित (फाइव्ह स्टार रँकींग) साठी सरकारने दिलेले सर्व नियम पूर्ण करत आहे. त्यामुळे शहर स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत कचरा मुक्त शहर म्हणून पाच तारांकित नामांकन दर्जा मिळण्यासाठी केंद्र सरकारकडे अर्ज केला जाणार आहे. त्याला महासभेची मान्यता घेतली जाणार आहे.

याबाबत आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय म्हणाले, कचरामुक्त शहरात फाइव्ह स्टार रँकींग मिळण्याचे केंद्र सरकारचे सर्व निकष पालिका पूर्ण करत आहे. त्यामुळे महासभेची मान्यता घेवून केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविणार आहोत.

मागीलवर्षी नाकारला होता ‘पंचतारांकित’ दर्जा

केंद्र सरकारने मागीलवर्षी पिंपरी-चिंचवड शहराला कचरामुक्त स्पर्धेतील ‘पंचतारांकित’ दर्जा नाकारला होता. मोशी कचरा डेपोत ‘लॅन्डफिल’ (कचरा जमिनीत जिरवणे – भूभरण) बरोबर नसल्याचे कारण देत शून्य स्टार दिले होते. त्यामुळे यंदा तरी कचरामुक्त स्पर्धेत शहराला ‘पंचतारांकित’ दर्जा मिळणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.