Pimpri News: ‘गोरगरिबांना 3 हजारांची मदत करून श्रीमंत महापालिका बुद्धीनेही श्रीमंत असल्याचे सिद्ध करा’

महापौरांची आयुक्तांना सूचना :

एमपीसी न्यूज – ज्यांच्या कष्टाने ही नगरी उभी राहिली आहे ते नागरिक कोरोनाच्या परिस्थितीमुळे आज आर्थिक संकटात आहेत. त्यांच्या चुली बंद आहेत. त्यामुळे त्यांना 3 हजार रुपयांची मदत करणे गरजेचे आहे. आयुक्त चांगले शब्दांकन करू शकतात. त्यामुळे कायद्याच्या चौकटीत बसवून गोरगरिबांना आर्थिक मदत करावी आणि श्रीमंत महापालिका बुद्धीनेही श्रीमंत असल्याचे सिद्ध करावे, अशी सूचना महापौर उषा ढोरे यांनी आयुक्तांना केली.

महापालिकेची जून महिन्याची सर्वसाधारण सभा आज (शुक्रवारी) आयोजित केली आहे. महापौर उषा ढोरे सभेच्या अध्यक्षस्थानी आहेत. लॉकडाऊनमध्ये अडचणीत आलेल्या आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना एकवेळी 3 हजार रुपयांची मदत देण्यास नियमाचे कारण देत आयुक्तांनी विरोध केल्याने सत्ताधारी भाजपने महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडले. सुमारे साडेतीन तास या विषयावर चर्चा केली.

नगरसेवकांच्या भावना जाणून घेतल्यानंतर महापौर उषा ढोरे म्हणाल्या, चर्चेनंतर मार्ग सापडतो. त्यामुळे चर्चा केली. आयुक्तांनी सभागृहाच्या भावना ऐकल्या आहेत. नगरसेवकांच्या भावनांचा आदर करणे आयुक्तांचे कर्तव्य आहे. ज्यांच्या कष्टाने ही नगरी उभी राहिली आहे ते नागरिक कोरोनाच्या परिस्थितीमुळे आज आर्थिक संकटात आहेत. त्यांच्या चुली बंद आहेत. आपण श्रीमंत महापालिकेचे आयुक्त आहात. त्यामुळे कायद्याच्या चौकटीत बसवून गोरगरिबांना एकावेळी 3 हजार रुपयांची मदत करणे आवश्यक आहे.

आयुक्तांनी अगोदर 3 हजार रुपयांची मदत करता येईल असे सांगितले. त्यामुळे आम्ही मागणी लावून धरली आहे. कायद्याची चौकट नागरिकांसाठी आहे. जनतेचे पैसे जनतेला द्यायचे आहेत. ते कसे देता येईल, याचा अभ्यास करावा. पुढच्या सभेपर्यंत हा विषय मार्गी लावा. श्रीमंत महापालिका बुद्धीनेही श्रीमंत आहे हे सिद्ध करा, अशी सूचना महापौरांनी आयुक्तांना केली.

दरम्यान, सत्ताधारी भाजपने यावर प्रशासनाला खुलासा करण्याची संधी दिली नाही. त्यामुळे आयुक्तांना आपली भूमिका मांडता आली नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.