Pimpri News: शहरातील खासगी मराठी माध्यमांच्या शाळांचा शास्तीकर माफ होणार

शाळांची रहिवाशी वापर नोंदणी करणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील खासगी मराठी माध्यमांच्या शाळांचा शास्तीकर आणि करावरील दंड माफ करण्यात येणार आहे. तसेच शाळांचे व्यावासायीक वापर न दाखविता रहिवाशी वापर नोंदणी केली जाणार आहे. याबाबतच्या सदस्य ठरावाला स्थायी समितीने आयत्यावेळी मान्यता दिली. दरम्यान, अनेक राजकीय पदाधिकारी, नामांकित लोकांच्या शाळांनी शास्तीकर थकविला आहे.

महापालिकेच्या हद्दीमधील आर्थिकदृष्ट्या मागास व दुर्बल घटकांचे विद्यार्थी हे खासगी मराठी माध्यमांच्या शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत. या शाळांचे आर्थिक उत्पन्न हे फार कमी स्वरुपाचे आहे. मात्र, या खासगी मराठी शाळांच्या नोंदी या व्यावसायीक वापर म्हणून नोंदी झालेल्या आहेत. कोरोना काळामध्ये शासन निर्णयानुसार या शाळा एक वर्षांपासून बंद आहेत. यामुळे शाळांना आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. या शाळांना महापालिकेकडून शास्तीकर व करांवरील दंड आकारण्याच्या नोटीसा देण्यात आलेल्या आहेत.

मराठी माध्यमांच्या शाळांची वाढ होण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न चालू असताना मराठी माध्यमांच्या शाळांना व्यावसायीक दराने लावलेला कर अन्यायकारक आहे. या शाळांना लावण्यात आलेल्या व्यावासायिक वापर कर रद्द करुन रहिवाशी वापर अशा नोंदी कराव्यात. खासगी मराठी माध्यमांच्या शाळांचा शास्तीकर आणि करावरील दंड माफ करण्यात यावा, असे ठरावात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.