Pimpri News : स्थायी समिती सभेत आमदार समर्थक नगरसेवकांचा राडा

चिंचवड आणि भोसरी आमदार समर्थक नगरसेवकांमधील वाद विकोपाला

एमपीसी न्यूज – चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप आणि भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे या दोन आमदार समर्थक नगरसेवकांमधील अंतर्गत वाद विकोपाला गेला. वाकडच्या रस्ते विकासाच्या मुद्द्यावरून दोन्ही आमदार समर्थक नगरसेवकांमधील वादाचे पडसाद स्थायी समिती सभेत आज, बुधवारी उमटले.

आमदार जगताप समर्थक नगरसेवकांनी आयुक्त आणि नगरसचिवांना अरेरावी करत स्थायी समिती सभेत चांगलाच राडा घातला. सुरक्षारक्षकांना धक्काबुक्की करत माईकची तोडफोड केली. कागदपत्रे भिरकावित काचेचे ग्लास फोडले.

या राड्यातच स्थायी समिती सभापतींनी एका सभेचे कामकाज पुर्ण करत तीन सभांचे कामकाज एका आठवड्यापर्यंत पुढे ढकलले. हा गोंधळ तब्बल तासभर सभागृहात सुरु होता.

विधानपरिषदेच्या पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीची आचारसंहिता नुकतीच संपुष्टात आली आहे. आचारसंहितेमुळे मागील आठ आठवडे स्थायी समितीचे कामकाज बाधित झाल्यामुळे स्थायी समितीच्या आज (बुधवार, दि. 9) च्या सभेत चार विषयपत्रिकेवरील दोनशेहून अधिक प्रस्ताव निर्णयासाठी प्रतिक्षेत होते.

सभेच्या कामकाजाला सुरुवात होताच आमदार जगताप समर्थक नगरसेवक शशिकांत कदम यांनी वाकड रस्ते विकासाच्या मुद्दयाला हात घातला. आयुक्तांनी रस्ते विकासाबाबात राज्य सरकारकडे सकारात्मक भूमिका का मांडली ? सत्ताधारी भाजपच्या ठरावाला महत्त्व नाही का ? आम्ही मुर्ख आहोत काय ? याचा खुलासा करा. अशी मागणी शशिकांत कदम यांनी केली.

त्यावर आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी ‘पुढील आठवड्यात खुलासा करतो’ असे उत्तर दिले. सभापती संतोष लोंढे यांनी त्यास मान्यता दिली. आयुक्त – सभापतींच्या या उत्तरामुळे लक्ष्मण जगताप समर्थक नगरसेवकांचे पित्त खवळले.

शशिकांत कदम, अंबरनाथ कांबळे, संतोष कांबळे, अभिजीत बारणे, झामाबाई बारणे आणि आरती चोंधे या सहा नगरसेवकांनी आक्रमक पवित्रा घेत सभा कामकाज तहकूब करा, अशा धोशा लावला. तर, शहर विकासाचे असंख्य प्रस्ताव प्रलंबित आहेत, त्याचा निपटारा करु अशी भूमिका सभापती लोंढे यांनी घेतली.

त्यातच आमदार लांडगे समर्थक नगरसेविका सुवर्णा बुर्डे यांनीही सभापतींची बाजू उचलून धरत सभा कामकाज चालू ठेवा, ज्यांना जायचे असेल त्यांनी बाहेर जावे अशी शेरेबाजी केली. त्यामुळे वातावरण अधिकच चिघळले. आम्हाला सभेतून बाहेर काढता का, असा कांगावा करत सहा नगरसेवकांनी आदळआपट सुरु केली. सभापती पक्षविरोधी भूमिका घेत असून त्यांना राष्ट्रवादी कॉग्रेस, शिवसेना नगरसेवकांची साथ आहे, असा आरोप या नगरसेवकांनी केला.

तसेच, आयुक्त – नगरसचिवांना अरेरावी करत त्यांच्यापुढील कागदपत्रे टराटरा फाडत ती हवेत भिरकावली. अधिकारी – नगरसेवकांसमोरील ध्वनिक्षेपक उपसून काढत त्यांची मोडतोड केली. काचेचे ग्लास जमिनीवर फोडत संताप व्यक्त केला.

या गदारोळातच सभापतींनी एका सभेचे कामकाज रेटून नेले. तर उर्वरित तीन सभा 16 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.