Pimpri News: राहुल कलाटे यांचा शिवसेना गटनेतेपदाचा राजीनामा

एमपीसी न्यूज – पक्षाच्या आदेशानुसार राहुल कलाटे यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील शिवसेना गटनेतेपदाचा आज (मंगळवारी) राजीनामा दिला आहे. पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याकडे राजीनामा दिला आहे.

फेब्रुवारी 2017 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेचे नऊ नगरसेवक निवडून आले आहेत. राहुल कलाटे प्रभाग क्रमांक 25 वाकड, माळवाडी, पुनावळे, पंढारेवस्ती, भुजबळ, भूमकरवस्ती या प्रभागातून निवडून आले आहेत.

महापालिकेवर पहिल्यांदाच निवडून आलेल्या व त्यावेळी शिवसेना शहरप्रमुख असलेल्या कलाटे यांची शिवसेना गटनेतेपदी वर्णी लागली. त्यांनी दोन वर्षे स्थायी समितीचे सदस्यपद देखील भूषविले. तसेच चिंचवड विधानसभा मतदार संघातून कलाटे यांनी निवडणूकही लढविली होती. एक लाखाच्या पुढे मते मिळाली होती.

महापालिकेच्या स्थायी समिती सदस्यपदी 18 फेब्रुवारी रोजी नवीन आठ सदस्यांची निवड झाली. शिवसेनेच्या कोट्यातून अश्विनी चिंचवडे यांचे नाव पक्षाने दिले होते. परंतु, गटनेते राहुल कलाटे यांनी आपल्या समर्थक मीनल यादव यांचे नाव स्थायी समितीसाठी दिल्याचा आरोप करत एका गटाने आक्रमक भूमिका घेतली. कलाटे यांची पक्षश्रेष्टींकडे तक्रार केली.

त्यावर पक्षाने 24 फेब्रुवारी रोजी कलाटे यांना नोटीस देत खुलासा मागविला होता. त्यानंतर कलाटे यांनी आज गटनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. आगामी महापालिका निवडणुकीला अवघ्या दहा महिन्यांचा कालावधी शिल्लक असताना कलाटे यांना राजीनामा द्यावा लागला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.