Pimpri Rain Update : परतीच्या पावसाने शहराला झोडपले; अनेक ठिकाणी तुंबले पाणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराला परतीच्या पावसाने झोडपले आहे. बुधवारी दुपारपासून कोसळत असलेला पाऊस मध्यरात्रीपर्यंत पडत होता. यामुळे शहरातील पिंपरी, चिंचवड, वाकड, सांगवी, निगडी, प्राधिकरण यासह अनेक भागात पाणी तुंबले होते. काही ठिकाणच्या पाण्याचा निचरा झाला आहे. तर, काही भागातील पाणी अद्यापही साचले आहे.

शहरात बुधवारी दुपारपासून पाऊस कोसळत होता. रात्री पावसाचा जोर वाढला होता. मध्यरात्रीपर्यंत पाऊस कोसळत होता. नदी, ओढ्याच्या बाजूच्या घरात, दुकानात पावसाचे पाणी शिरले आहे. पाणी तुंबून राहिले आहे. पंचशिल बौद्ध विहारच्या पाठीमागील घरात पाणी शिरले होते. त्यामुळे नागरिकांना पाण्यात भिजत रात्र काढावी लागली. पाणी तुंबल्याच्या 40 ते 50 तक्रारी पालिकेकडे आल्या आहेत. अद्यापही अनेक ठिकाणी पाणी तुंबलेले आहे.

वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडल्यामुळे अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरण्याच्या तसेच झाडे पडण्याच्या घटना घडल्या आहेत. पिंपरी चिंचवड अग्निशमन विभागाला रात्रभर मोठी कसरत करावी लागली आहे.

पालिकेचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल म्हणाले, पिंपरी, वाकड, निगडी, दिघी अशा अनेक भागात पाणी साचले होते. शहरातील 40 भागात पाणी साचल्याच्या तक्रारी आल्या होत्या. पालिकेची यंत्रणा रात्रभर फिल्डवर आहे. अनेक भागातील पाण्याचा निचरा झाला आहे. काही भागातील पाणी अद्यापही साचले आहे. ते पाणी काढण्याचे काम सुरू आहे.

राज्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. काही ठिकाणी ढगफुटीसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.

दरम्यान, म्हाळसाकांत चौक प्राधिकरण रोड येथे पावसाने झाड पडले आहेत. रस्त्याच्या मधोमध झाड पडल्यामुळे रस्ता पूर्ण बंद झाला आहे. एम्पायर इस्टेट, चिंचवड येथे आगीची घटना घडली.

मुसळधार पावसामुळे शहरातील रस्ते जलमय झाले होते. रस्त्यांना अक्षरशः नद्या-नाल्यांचे स्वरूप आले होते. अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला होता. अनेक घरे, सोसायट्यांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांना रात्रभर पावसात जागून घालवावी लागली आहे. अग्निशमन विभागाकडून मदतकार्य अजूनही सुरू आहे.

शहरातील पाणी शिरल्याच्या घटना 
आदिनाथ नगर, भोसरी
सेक्टर नंबर 25, स्वामी समर्थ मंदिराजवळ, प्राधिकरण
शाहूनगर, निगडी
गिरजोबा मंदिराजवळ, भाटनगर, पिंपरी
मोशी-आळंदी रोड, सस्तेवाडी
निलायम सोसायटी, पिंपरी गाव
पर्यटन संकुल जवळ, भोसरी एमआयडीसी
सेक्टर नंबर 27, प्राधिकरण
लोंढे वस्ती, ताथवडे
जैन मंदिर, दत्तवाडी, आकुर्डी
श्रीराम कॉलनी, वाकड
पालिका हॉस्पिटल समोर, शिवदत्त नगर, आकुर्डी
अंकुश चौक, निगडी
मॉडर्न शाळेजवळ, यमुनानगर, निगडी
ज्ञानेश पार्क, गल्ली क्रमांक 1, कृष्णा चौक, नवी सांगवी
एम्पायर इस्टेट, गेट नंबर 10, चिंचवड
संतोषी माता मंदिराजवळ, मोहननगर, चिंचवड
ओम कॉलनी, पिंपळे गुरव

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.