Pimpri News: महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी राजू मिसाळ

राष्ट्रवादी काँग्रेसचे पालिकेत जनतेतून निवडून आलेले 36 नगरसेवक होते. त्यातील कोरोनामुळे ज्येष्ठ नगरसेवक दत्ता साने, जावेद शेख यांचे दुर्दैवाने निधन झाले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे संख्याबळ 34 वर आले आहे.

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेत विरोधी पक्षात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी निगडी, प्राधिकरणातील ज्येष्ठ नगरसेवक राजू मिसाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याबाबतचा प्रस्ताव आज (दि.7) नगरसचिवांकडे जमा करण्यात आला. गटनेतेपदी मिसाळ यांची निवड झाल्याची नोंदणी पुण्याच्या विभागीय आयुक्तांकडे करण्यात येणार आहे. 34 नगरसेवक असलेल्या राष्ट्रवादीचा गटनेता पालिकेचा विरोधी पक्षनेता असल्याने मिसाळ नवे विरोधी पक्षनेते असणार आहेत. विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याकडे अधिकृत नोंदणी झाल्यानंतर महापौर उषा ढोरे या मिसाळ यांच्या नियुक्तीची घोषणा करतील.

राष्ट्रवादी काँग्रेसचे पालिकेत जनतेतून निवडून आलेले 36 नगरसेवक होते. त्यातील कोरोनामुळे ज्येष्ठ नगरसेवक दत्ता साने, जावेद शेख यांचे दुर्दैवाने निधन झाले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे संख्याबळ 34 वर आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने दरवर्षी विरोधी पक्षनेता बदलण्याचा निर्णय घेतला आहे. विरोधी पक्षनेता हा स्मार्ट सिटीचा पदसिद्ध संचालक असतो. त्यामुळे हे पद मानाचे आहे.

पहिल्यावर्षी पिंपरी विधानसभा मतदारसंघातील योगेश बहल, दुस-यावर्षी भोसरी मतदारसंघातील चिखलीचे प्रतिनिधित्व करणारे दत्ता साने, तिस-यावर्षी चिंचवडमधील पिंपळे सौदागरचे प्रतिनिधीत्व करणारे नाना काटे यांच्याकडे पद देण्यात आले होते.

एक वर्षाचा कालावधी संपल्याने काटे यांनी 2 सप्टेंबर रोजी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिला होता. विरोधी पक्षनेते पदासाठी माजी महापौर वैशाली घोडेकर, माजी उपमहापौर राजू मिसाळ, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यात रस्सीखेच होती. त्यात मिसाळ यांनी बाजी मारली आहे.

पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता चौथ्यावर्षी निगडी, प्राधिकरणातील ज्येष्ठ नगरसेवक राजू मिसाळ यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपदाची धुरा सोपविली आहे. मिसाळ राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक आहेत. त्यांची नगरसेवकपदाची तिसरी टर्म आहे. यापूर्वी त्यांनी उपमहापौर, क्रीडा समिती सभापती, प्रभाग समितीचे अध्यक्षपद भूषविले आहे. स्थायी समितीचे दोन वर्षे सदस्य देखील ते होते.

पालिकेची आगामी निवडणूक 15 महिन्यांवर येवून ठेपली आहे. पक्षाला जनतेसमोर जायचे आहे. पालिकेत पुन्हा सत्ता आणण्यासाठी मिसाळ यांना आक्रमक भूमिका घ्यावी लागणार आहे. सत्ताधारी पक्षाला कोंडीत पकडावे लागेल. चुकीच्या कामाला प्रखर विरोध करावा लागणार आहे.

निवडणुकीचे गणिते डोळ्यासमोर ठेवूनच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधी पक्षनेतेपदाची धुरा मिसाळ यांच्या हाती सोपविली असल्याचे मानले जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.