Pimpri News: मास्कविना रॅम्पवॉक, सुरक्षित अंतराचा फज्जा; महापौरांवर कारवाई करा – खासदार डॉ. कोल्हे

एमपीसी न्यूज – कोरोनाचा प्रसार पुन्हा वाढत असल्याने राज्य सरकारने निर्बंध जाहीर केले असताना पिंपरी-चिंचवड भाजपच्या महापौर उषा ढोरे यांनी ‘फॅशन शो’ आयोजित करत नागरिकांचा जीव धोक्यात घातला. या कार्यक्रमात सुरक्षित अंतर, कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे दिसून येत आहे. कोरोनाचे नियम मोडल्यावर प्रशासनाकडून सर्वसामान्य जनतेवर कारवाई होते. तशीच कारवाई महापौरांवरही व्हायला हवी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केली आहे.

भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त महापौर उषा ढोरे यांच्यावतीने सोमवारी चिंचवड येथे ‘फॅशन शो’चे आयोजन केले होते. कोरोनाचे नियम कडक केले असतानाही या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. नियमांचे कोणतेही पालन केले नाही. अनेकांनी मास्कही परिधान केला नव्हता. महापौर उषा ढोरे यांनीही मास्कविना रॅम्प वॉक केला.

यावर राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी ट्विटरद्वारे महापौरांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. खासदार डॉ. कोल्हे यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ”महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या आवाहनानंतर अनेक राजकीय व्यक्तींनी आपले पुर्वनियोजित कार्यक्रम पुढे ढकलले आहेत.

स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी पुण्यात बैठक घेऊन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी निर्बंध जाहिर केले. मुख्यमंत्र्यांनीही त्याच दिवशी सायंकाळी सोशल माध्यमातून जनतेशी संवाद साधला.

मात्र, पिंपरी-चिंचवडच्या भाजपच्या महापौर ढोरे यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या आवाहनाकडे सपशेल दुर्लक्ष करत ‘फॅशन शो’ आयोजित करत नागरिकांचा जीव धोक्यात घातला. हे अतिशय खेदजनक आहे”.

”या कार्यक्रमात सोशल डिस्टन्सिंग व कोरोनाविषयी शासनाने निर्धारित केलेल्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे दिसून येत आहे. हे लक्षात घेता, कोरोनाचे नियम मोडल्यावर प्रशासनाकडून सर्वसामान्य जनतेवर कारवाई होते, तशीच कारवाई महापौरांवरही व्हायला हवी”, असे डॉ. कोल्हे यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री ठाकरे, उपमुख्यमंत्री पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनाही ट्विट टॅग केले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.