Pimpri corona News: कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ; वायसीएम रुग्णालय फुल्ल

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत. त्यामुळे रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढले असून बेडची मोठी कमतरता जाणवत आहे. महापालिकेची रुग्णालये फुल्ल झाली आहेत. त्यामुळे वायसीएम रुग्णालयात पत्र्याचे शेड टाकून वॉर्ड तयार केला असून तिथे रुग्णांना ऑक्सिजन देण्याची वेळ आली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ होत आहे. दिवसाला दोन हजारहून अधिक नवीन रुग्णांची भर पडत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे महापालिकेची रुग्णालये हाऊसफुल्ल झाली आहेत.

वायसीएम, पिंपरीतील नवीन जिजामाता, भोसरीतील नवीन रुग्णालय, भोसरीतील बालनगरी कोविड केअर सेंटर, ॲटो क्लस्टर, घरकुल येथील कोविड केअर सेंटर हाऊसफुल्ल झाले आहेत. वायसीएम रुग्णालयात एक आयसीयू वगळता सर्व वॉर्डमध्ये कोरोनाचे रुग्ण आहेत.

वायसीएममध्ये जागा नसल्याने बाहेरील बाकड्यावर रुग्णांवर उपचार केले जात आहेत. बाकड्यावरच रुग्णाला ऑक्सिजन द्यावा लागत आहे. त्यामुळे बेडची संख्या वाढविण्याची मागणी केली जात आहे.

याबाबत महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विनायक पाटील म्हणाले, “कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. रुग्णालये फुल्ल झाली आहेत. वायसीएमएचमध्ये पत्राशेड टाकून वॉर्ड तयार केला आहे. तिथे रुग्णांवर उपचार केले जात आहेत. कोविड केअर सेंटरमध्ये वाढ करण्याची आवश्यकता आहे. लक्षणे नसलेले आणि होम आयसोलेट असलेले रुग्ण बाहेर फिरतात. त्यामुळे कोरोनाचा प्रसार होताना दिसत आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. गर्दीत जाणे टाळावे. विनाकारण बाहेर फिरू नये. वारंवार हात धुवावेत. मास्कचा वापर करावा”

दरम्यान, पिंपरी-चिंचवड शहर आणि जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील कोरोना रुग्णांवर उपचार होण्यासाठी पीएमआरडीएतर्फे पिंपरीतील नेहरूनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडियम येथे 816 बेडचे अद्ययावत जम्बो कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. शहरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. रुग्णांना ऑक्सीजन, आयसीयू बेडची आवश्यकता भासणार असून जम्बो कोविड सेंटरमधील 200 बेड कार्यान्वित करण्याचे वैद्यकीय विभागाचे नियोजन आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.