Pimpri News: जन्म दाखल्यावर मुलगा असल्याची नोंद पण रुग्णालयाने पालकांकडे सोपवली मुलगी

रुग्णालय प्रशासनावर बाळाच्या नातेवाईकांनी बाळ बदलल्याचे आरोप केले आहेत. तर रुग्णालय प्रशासनाने पालकांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

एमपीसी न्यूज – कोणत्या ना कोणत्या कारणासाठी चर्चेत असलेलं पिंपरी येथील डॉ. डी वाय पाटील रुग्णालय पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. महापालिकेच्या जन्म दाखल्यावर एका बाळाची मुलगा म्हणून नोंद आहे. जन्मतः बाळाची प्रकृती नाजूक असल्याचे कारण सांगून आईपासून चार दिवस दूर ठेवल्यानंतर रुग्णालय प्रशासनाने पालकांकडे मुलगी सोपवली.

रुग्णालय प्रशासनावर बाळाच्या नातेवाईकांनी बाळ बदलल्याचे आरोप केले आहेत. तर रुग्णालय प्रशासनाने पालकांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

पिंपरीमधील डॉ. डी वाय पाटील रुग्णालयात 11 ऑगस्टच्या रात्री रिटा जगधने यांची प्रसूती झाली. ज्यावेळी रिटा यांची प्रसूती झाली, त्यावेळी त्यांची आई हिराबाई नवपुते या त्या ठिकाणी उपस्थित होत्या. प्रसूती झाल्यावर त्यांना रुग्णालयामधील नर्स स्टाफने तुमच्या मुलीची प्रसूती झाली असून त्यांना मुलगा झाला असल्याचे हिराबाई नवपुते यांना सांगण्यात आले.

बाळाची प्रकृती नाजूक असल्याने बाळाला काही दिवस काचेत ठेवावे लागेल, असेही आई हिराबाई यांना सांगण्यात आले. मग कागदावर अंगठा देऊन त्या बाहेर आल्या. आई हिराबाईंनी बाहेर येताच बाळाचे वडील अनिल जगधने यांना मुलगा झाल्याची आनंदवार्ता सांगितली.

दुसऱ्या दिवशी महापालिकेकडे करण्यात येणाऱ्या जन्म नोंदणीच्या दाखल्यावर मुलगा अशी नोंद करण्यात आली. पुढील चार दिवस रुग्णालयातील नर्स बाळाच्या आईकडून दूध घायच्या आणि काचेत ठेवलेल्या बाळाला पाजायच्या.

बाळाच्या तब्येतीत सुधारणा झाल्याने बाळाला 15 ऑगस्ट रोजी आईकडे देण्यात आले. बाळ हातात आल्याच्या आनंदात संपूर्ण कुटुंब असताना बाळाने शी केली आहे का? हे बघितले असता आपल्या हातातील बाळ मुलगा नसून मुलगी असल्याचे निदर्शनास आले.

त्यानंतर बाळाची आजी हिराबाई यांनी तातडीने रुग्णालयाला याचा जाब विचारला. तेव्हा रुग्णालयाने त्यांना खोटं ठरवायला सुरुवात केली. रुग्णालयातील प्रत्येक कागदावर मुलगी असल्याचं त्यांना सांगण्यात आलं.

जन्म दाखला नोंदणीच्या अर्जावर मात्र, रुग्णालयाने उडवाउडवीची उत्तरं दिली, असे आरोप नातेवाईकांनी केले आहेत.

प्रसूती विभागाचे प्रमुख डॉ. हेमंत देशपांडे यांनी, “रुग्णालयाच्या प्रत्येक नोंद वहीमध्ये मुलीची नोंद आहे.” असे म्हणत कुटुंबीयांचे सर्व आरोप फेटाळून लावले. जन्म दाखल्यावर असलेल्या मुलाच्या नोंदीबाबत त्यांच्याकडे काही स्पष्टीकरण नव्हते. ज्या नर्स त्या दिवशी ड्युटीवर होत्या, त्या आज रजेवर असल्याची सारवासारव रुग्णालयाकडून करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.