Pimpri News: महापालिका रुग्णालयांतील मानधनावरील भरती बंद; वैद्यकीय अधिकारी, परिचारिकांना एजन्सीद्वारे नेमणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयासह इतर रुग्णालये, दवाखान्यांमध्ये वैद्यकीय अधिकारी, स्टाफनर्स, फार्मासिस्ट, सफाई कर्मचारी आदी पदांची सहा महिन्यांसाठी केली जाणारी मानधन स्वरूपातील भरती बंद केली आहे. त्याऐवजी ही पदे बाह्यस्त्रोताद्वारे एखाद्या एजन्सीच्या माध्यमातून नेमण्यासाठी नव्याने भरती प्रक्रीया राबविण्यात येणार आहे.

महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयाला आवश्यक असलेली वैद्यकीय अधिकारी, स्टाफनर्स, फार्मासिस्ट, सफाई कर्मचारी आदी पदे सहा महिन्यांसाठी मानधन स्वरूपात भरण्यात येत असतात. त्यासाठी वृत्तपत्रात जाहिरात प्रसिद्ध करून परिक्षा घेण्यात येते. निवड यादी प्रसिद्ध करून ही प्रक्रीया दर सहा महिन्यांने राबवावी लागते. सद्यस्थितीत स्थायी आणि अस्थायी आस्थापनेवरील पद संख्या अपुरी आहे. त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात दर सहा महिने कालावधीकरिता अस्थायी स्वरूपात मानधनावर सर्व पदे भरली जात आहेत. त्यामध्ये प्रत्येक सहा महिन्यानंतर जुन्या अधिकारी व कर्मचारी यांना संधी न देता नवीन उमेदवारांना संधी द्यावी, असा सरकारचा निर्णय आहे.

प्रत्येक सहा महिन्यांनंतर जुन्या प्रशिक्षित झालेल्या कर्मचाऱ्यांना काढून नवीन भरती प्रक्रीया राबवावी लागते. त्यांना पुन्हा प्रशिक्षण द्यावे लागते. काही कारणास्तव काही महिन्यांची मुदतवाढ दिल्यास काही कर्मचारी कामगार न्यायालयामध्ये दावा दाखल करून कायमस्वरूपी करण्यासाठी दाद मागतात. त्यामुळे प्रत्येक सहा महिन्याने नवीन कर्मचारी घेतल्यामुळे या कर्मचाऱ्यांचा म्हणावा तसा उपयोग रुग्णालयाला होत नाही.

महापालिकेचे वायसीएम रुग्णालय 750 खाटांचे आहे. रुग्णालयात सर्व विभाग अद्ययावत आहेत. रुग्णांच्या सोयीच्या दृष्टीने नवीन विभाग सुरु करण्यात येणार आहेत. त्यामध्ये वाढीव शस्त्रक्रीया कक्ष, वाढीव बाल रुग्ण अतिदक्षता कक्ष, वाढीव अतिदक्षता कक्ष, तात्काळ उपचार कक्ष आदी विभाग सुरु करण्यात येणार आहेत. वैद्यकीय विभागाकडील रुग्णालयांना आवश्यक पदे भरण्याकरिता मागणी घेण्यात आली आहे. तसेच महापालिकेच्या इतर नऊ रुग्णालयांमध्ये आणि 29 दवाखान्यांमध्येही वैद्यकीय अधिकारी, स्टाफनर्स, वॉर्डबॉय, फार्मासिस्ट आदी कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे.

महापालिकेकडील वैद्यकीय अधिकारी तसेच कर्मचारी निवृत्त झाल्यानंतर त्याचा ताण इतर अधिकारी, कर्मचाऱ्यांवर येतो. ही बाब लक्षात घेऊन वायसीएम रुग्णालयाचे अधिष्ठाता, सर्व रुग्णालय प्रमुख, वैद्यकीय विभाग यांनी केलेल्या मागणीनुसार ही सर्व तांत्रिक पदे बाह्यस्त्रोताद्वारे एखाद्या एजन्सीच्या माध्यमातून नेमण्यासाठी नव्याने भरती प्रक्रीया राबविण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.