Pimpri News: शहराला कोरोनामुक्त करण्यासाठी ‘मी जबाबदार’ अ‍ॅपवर नोंदणी करा; महापालिकेचे आवाहन

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणू प्रसारावरील प्रतिबंधात्मक उपाय योजनेअंतर्गत पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने ‘मी जबाबदार’ या अ‍ॅपची निर्मिती करण्यात आली असून अ‍ॅन्ड्रॉईड आणि आयओएस अशा दोन्ही प्लॅटफॉर्मवर ते मोफत उपलब्ध आहे. ‘मी जबाबदार’ या कोविड विरोधी मोहिमेमध्ये सहभागी होण्यासंदर्भात मी जबाबदार अ‍ॅपवर जास्तीत जास्त नागरिकांनी नोंदणी करून आपल्या शहराला कोरोनामुक्त करण्यासाठी सहाय्य करावे, असे आवाहन आयुक्त राजेश पाटील यांनी केले आहे.

कोरोना साथीच्या प्रादुर्भावामुळे जनजीवनावर मोठा परिणाम झाला आहे. सध्या रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी भविष्यामध्ये कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तविण्यात येत आहे. भविष्यामध्ये येणाऱ्या कोरोना लाटेवर नियंत्रण ठेवण्यासाठी आत्ताच पूर्वतयारी करणे आवश्यक आहे असे आयुक्त पाटील यांनी सांगितले. कोरोनाविरुद्ध लढा देण्यासाठी आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली असणे गरजेचे असून कोविड 19 प्रतिबंधात्मक लसीकरण हा त्यावर प्रभावी उपाय आहे.

कोरोना लसीकरणासाठी जास्तीत जास्त नागरिकांची नोंदणी होणे गरजेचे आहे. कोरोनाचे उपचार वेळीच मिळण्यासाठी रुग्ण आणि नातेवाईकांना कोरोना रुग्णांसाठी उपलब्ध असलेले बेड्स, लहान मुलांचे बेड्स, कोविड चाचणी केंद्र, महापालिकेच्या वतीने निर्गमित करण्यात आलेले आदेश यांची माहिती मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. नागरिकांच्या या आवश्यकतेनुसार पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने ‘मी जबाबदार’ या अ‍ॅपची निर्मिती करण्यात आली असून अ‍ॅन्ड्रॉईड आणि आयओएस अशा दोन्ही प्लॅटफॉर्मवर ते मोफत उपलबध आहे, अशी माहिती आयुक्त पाटील यांनी दिली.

मी जबाबदार अ‍ॅप जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचावे यासाठी महापालिकेतर्फे विशेष प्रयत्न केले जात आहेत. नागरिकांना कोरोना संदर्भात असलेल्या सोयी सुविधांची माहिती अ‍ॅपवर उपलब्ध असणार आहे. महापालिकेच्या वतीने अतिवृद्ध, अंथरुणाला खिळून असणारे रुग्ण आणि दिव्यांग नागरिकांचे घरी जाऊन लसीकरण करण्यात येत आहे. त्यासाठी या नागरिकांची मी जबाबदार अ‍ॅपवर नोंदणी करणे आवश्यक आहे. व्हॅक्सिन ऑन व्हील्स या उपक्रमामध्ये सहभागी होणाऱ्या नागरिकाने एक किंवा अनेक अतिवृद्ध, अंथरुणाला खिळून असणारे रुग्ण आणि दिव्यांग नागरिकांची मी जबाबदार अ‍ॅपवरील ‘व्हॅक्सिन ऑन व्हील्स’ या सेक्शनमध्ये नोंदणी करणे आवश्यक आहे. ही नोंदणी झाल्यानंतर नोंदणी केल्याचा लॅपशॉट सोशल मीडियावर शेअर करून पीसीएमसी स्मार्ट सारथीला टॅग करावे. या नागरिकांना कोविडयोद्धा म्हणून डिजिटल प्रमाणपत्र देऊन सन्मानीत करणे प्रस्तावित आहे.

मी जबाबदार या उपक्रमामुळे अतिवृद्ध, अंथरुणाला खिळून असणारे रुग्ण आणि दिव्यांग नागरिकांच्या लसीकरणाला गती मिळणार आहे. आपली सोसायटी आणि परिसरातील एकही गरजू नागरिक लसीकरणा शिवाय राहू नये यासाठी सर्व सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांनी देखील आपले योगदान द्यावे, मी जबाबदार अ‍ॅपवर जास्तीत जास्त नागरिकांची नोंदणी करून आपल्या पिंपरी चिंचवडला कोरोनामुक्त करण्यासाठी सहाय्य करावे, असे आवाहन आयुक्त राजेश पाटील यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.