Pimpri News: शहरातील पाणीपुरवठा नियमित करा; राष्ट्रवादीची अजित पवार यांच्याकडे मागणी

पवना धरणामध्ये पाणीसाठा कमी झाल्यामुळे एप्रिल 2019 पासून पिंपरी-चिंचवड शहराला एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात येऊन त्याची अंमलबजावणी आजअखेर चालू आहे.

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराला अपुरा व कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याच्या नागरीकांच्या असंख्य तक्रारी येत आहेत. सत्ताधारी भाजपच्या नियोजनशून्य कारभारामुळे शहरातील नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. लहान, मोठ्या सर्व गृहनिर्माण सोसायट्यांना टँकरने पाणी मागवावे लागत आहे. शहरातील टँकर लॉबीला फायदा व्हावा म्हणून सत्ताधारी भाजपा आणि पालिका प्रशासनाने कृत्रिम पाणीटंचाई निर्माण केल्याचा आरोप करत तातडीने पाणी कपात रद्द करावी. शहरात सर्वत्र समान व पुरेशा दाबाने दररोज पाणीपुरवठा करण्यात यावा अशी मागणी माजी महापौर, राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नगरसेविका मंगला कदम यांनी केली आहे.

याबाबत उपमुख्यमंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांना निवेदन पाठविण्यात आले आहे. त्यात नगरसेविका कदम म्हणतात, पवना धरणामध्ये पाणीसाठा कमी झाल्यामुळे एप्रिल 2019 पासून पिंपरी-चिंचवड शहराला एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात येऊन त्याची अंमलबजावणी आजअखेर चालू आहे.

सध्या धरण क्षेत्रामध्ये पाऊस पडत असून पवना धरणामध्ये काल अखेर 100 टक्के पाणीसाठा असून धरणातून विसर्ग चालू झाला आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरास पवना धरणातील पाणी साठ्याला धक्का न लावता रावेत येथील पावसाचे वाहून आलेले पाणी नियमितपणे उचलून दररोज पाणी पुरवठा करणे शक्य आहे.

तसेच आपण एका बाजूला शहरात 24X7 पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करीत आहोत. त्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च करीत आहोत आणि ऐन पावसाळ्यात पाऊसाचे पुरसे पाणी असूनही एक दिवसाआड पाणी पुरवठा करीत आहोत. ही बाब निश्चितच खेदजनक आहे.

संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा अपुरा व कमी दाबाने होत असल्यामुळे शहरातील सर्व भागांमधून नागरीकांच्या असंख्य तक्रारी येत आहेत. सत्ताधारी भाजपच्या नियोजनशून्य कारभारामुळे शहरातील नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांचे दैनंदिन कामकाजाचे नियोजन कोलमडले आहे. विशेषतः महिला भगिनींना मोठा मनःस्ताप सहन करावा लागत आहे. लहान, मोठ्या सर्व सोसायट्यांना टँकरने पाणी मागवावे लागत आहे. शहरातील टँकर लॉबीला फायदा व्हावा म्हणून सत्ताधारी भाजपा आणि महापालिका प्रशासनाने कृत्रिम पाणीटंचाई निर्माण केली असून पाणी कपातीचा निर्णय घेतला आहे.

तातडीने ही पाणी कपात रद्द करावी, तसेच शहरात सर्वत्र समान व पुरेशा दाबाने दररोज पाणीपुरवठा करण्यात यावा. ज्यावेळी धरणातील पाणी साठा कमी होईल. त्यावेळी पालिका पदाधिका-यांची बैठक घेऊन पाणी कपाती संदर्भात त्यावेळी निर्णय घेण्यात यावा.

परंतु, सध्या दररोज पाणीपुरवठा करावा. रावेत येथील बंधा-यामध्ये येणारे पावसाचे पाणी नियमितपणे उचलून शहरास दररोज पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात यावा अशी मागणी कदम यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.