Pimpri News: कोरोना काळात महापालिका आयुक्त राजेश पाटील यांचे उल्लेखनीय काम – यशवंत भोसले

 कामगार नेते यशवंत भोसले यांनी मुख्यमंत्र्यांकडे केले आयुक्तांचे कौतुक

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमालीचा नियंत्रणात आला. मृत्यूदर घटला आहे. त्यानिमित्त राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष, कामगार नेते यशवंत भोसले यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे कौतुक केले. तसेच मुख्यमंत्री ठाकरे संयमाने परिस्थिती हाताळत असून राज्यातील जनतेला योग्य मार्गदर्शन करत असल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचेही आभार मानले.

याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठविले आहे. त्यात यशवंत भोसले यांनी म्हटले आहे की, पिंपरी- चिंचवड महापालिकेने कोरोनाचे नियम काटेकोरपणे पाळण्याकरिता कमालीची जागरुकता केली. शहरातील रुग्णालयांमध्ये प्रचंड सुधारणा केली. त्यामुळे कोरोनाच्या नवीन रुग्णांचा दर 100 च्या आतमध्ये आला. रिकव्हरी रेटही वाढला. मृत्यूचे प्रमाण घटले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून आपण करत असलेले मार्गदर्शन हे उपयोगी पडत आहे. त्याबद्दल आपले मनस्वी आभार.

पिंपरी-चिंचवड शहरामध्ये राजेश पाटील यांनी आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव कमालीचा नियंत्रणात आला. जनजागृती, आरोग्य विभागावर उत्तम पकड, शहराची स्वच्छता या अनेक संबंधित विभागात शिस्तबद्ध कार्यक्रम राबविला. त्यांच्या कार्यकुशलते बद्दल त्यांचे मनापासून  धन्यवाद!

राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या विनंतीला मान देत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील (वायसीएम) साफसफाईच्या निविदेस स्थगिती देऊन 217 कोरोना योद्ध्यांच्या आयुक्तांनी नोक-या वाचविल्या. त्यानिमित्त संघटनेचे अध्यक्ष, कामगार नेते यशवंत भोसले यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांची भेट घेऊन आभार मानले.

महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयातील कॉरीडॉर, अंतर्गत, बाह्य परिसरातील रस्ते, गार्डन, डक्ट, ड्रेनेज लाईनची साफसफाई व स्वच्छता हे काम ठेकेदाराकडून ठेकेदाराची स्वत:ची अत्याधुनिक उपकरणे, रसायने व मनुष्यबळाचा वापर करुन यांत्रिकी पद्धतीने साफसफाई करुन घेण्याची ई-निविदा प्रसिद्ध केली होती. 1 ऑगस्टपासून नवीन कामकाज सुरु करण्याचा आदेश दिला होता. परंतु, कोरोना काळात काम करणारे  217 कंत्राटी कर्मचारी बेरोजगार होणार होते. त्यांच्या नोक-या जाणार होत्या.

कंत्राटदार कोणीही असेल तरी चालेल. त्याच्याशी आम्हाला काही घेणेदेणे नाही. फक्त कोरोना काळात काम करणा-यांच्या नोकऱ्या जाऊ नयेत. त्यांना बेरोजगार करू नये आणि त्यांचे वेतन कमी होऊ नये. या 217 कोरोना योद्ध्यांच्या नोक-या वाचविण्याची राष्ट्रीय श्रमिक आघाडीने विनंती केली होती. त्याला मान देत निविदेस स्थगिती दिली आणि 217 कर्मचा-यांच्या नोक-या वाचविल्या त्याबाबत भोसले यांनी आयुक्त पाटील यांचे आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.