Pimpri news: दोन दिवसांत सगळीकडे रेमडेसिवीर उपलब्ध होईल : महापालिका आयुक्त

'नागरिकांनो, गडबडून, गोंधळून जाऊ नका'

एमपीसी न्यूज – रेमडेसिवीरची महाराष्ट्राभर कमतरता भासत आहे. ती भरून काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये इंजेक्शनचा साठा आबाधित ठेवण्यात यशस्वी झालो आहोत. त्याबरोबरच खासगी रुग्णालयात इंजेक्शन कसे पोहचतील, त्याविषयी उपाययोजना केल्या जात आहेत. पुढच्या दोन दिवसांत सगळीकडे रेमडेसिवीर उपलब्ध होईल, अशी माहिती महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी दिली. या परिस्थितीत गडबडून, गोंधळून जाऊ नका, असे आवाहनही त्यांनी शहरवासीयांना केले.

‘लॉकडाऊनमधील कर्तव्य आणि जबाबदारी’ यावर आयुक्त राजेश पाटील यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शहरवासीयांशी संवाद साधला.

आयुक्त पाटील म्हणाले, रेमडेसिवीर विषयी शास्त्रीय माहिती आणि तज्ज्ञांची मते पण बघितली पाहिजेत. रेमडेसिवीर सर्व रुग्णांना गरजेचे आहे का याबाबत वेगवेगळी मते आहेत. रुग्णांनी, त्यांच्या नातेवाईकांनी खात्री करून, डॉक्टरांच्या सल्ल्यानेच रेमडेसिवीर इंजेक्शन घेतले पाहिजे. त्याबरोबर इतर औषधे, थेरपीसुद्धा रुग्णासाठी गुणकारी ठरू शकते. रेमडेसिवीरबाबत खूप पॅनिक होऊ नये. आपल्या हातात काय आहे, आपण तत्काळ काय करु शकतो, यावर फोकस केला पाहिजे.

रेमडेसिवीरच्या उपलब्धतेबाबत आपण युद्धपातळीवर प्रयत्न करत आहोत. लवकरच ही समस्या संपेल. सध्या व्हेंटिलेटरच्या खाटांची कमतरता भासत आहे. महापालिका लवकरच 70 खाटा उपलब्ध करत आहे. खासगी रुग्णालयातील खाटांची क्षमताही वाढवत आहोत. पुढच्या दहा दिवसांत ऑक्सिजनच्या 600 खाटा उपलब्ध करत आहोत. त्यामुळे या परिस्थितीत गडबडून, गोंधळून जाऊ नये.

_MPC_DIR_MPU_II

जे रुग्ण होम आयसोलेशेनमध्ये आहेत किंवा ज्यांना कोरोना सदृश्य लक्षणे आहेत. त्यांनी गडबडून जाऊ नये. चाचणीसाठी गर्दी न करता काळजी घेतली, स्वतःला आयसोलेट केले तर आपण निश्चितपणे या संकटापासून वाचवू शकतो. यासाठी कॉल सेंटर सुरू करत आहोत. हजारो नागरिकांचे फोनद्वारे समूपदेश आणि त्यांच्या तब्येतीची चौकशी करणार आहोत.

सलग दहा दिवस प्रत्येक नागरिकांशी संपर्क साधला जाणार आहे. जेव्हा गरज वाटेल, तेव्हा पुढील उपचारासाठी सांगितले जाईल. त्यांची व्यवस्था केली जाईल. त्यामुळे घरीच राहून तब्येतीची व्यवस्थित काळजी घेतली तर तज्ज्ञ डॉक्टर आणि महापालिकेच्या सल्लागाराच्या मदतीने वेळोवेळी स्टेप घेतल्या तर निश्चितपणे या संकटावर मात करु शकतो, असे आयुक्त पाटील म्हणाले.

महापालिकेतर्फे वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत. रुग्णवाहिकेची उपलब्धता, औषधे, सर्व ठिकाणी लिक्विड ऑक्सिजनची गरज आहे. त्याकडेही महापालिका लक्ष देत आहे. टेलिमेडिसीन आणि खाट व्यवस्थापनासाठी वेगवेगळ्या विषयावरील समस्यांसाठी हेल्प लाईन आहेत. त्याचा नागरिकांनी फायदा घ्यावा.

कोरोनाची साखळी ब्रेक करण्यासाठी सरकारने संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे विनाकारण बाहेर फिरणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळले पाहिजे. जे निर्बंध लावले आहेत त्याचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे. यामुळे आरोग्य व्यवस्थेवर आलेला ताण कमी होईल. सर्वांनी संकटाचा सामना करू. कोरोना पसरणार नाही, याची काळजी घ्यावी. या लढाईसाठी शहरवासीयांची साथ मिळेल असा विश्वासही आयुक्त पाटील यांनी व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.