Pimpri News: कोरोना रुग्णांसाठी बेड आरक्षित ठेवा, आयुक्तांचे 40 खासगी रुग्णालयांना पत्र

अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांची माहिती

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने महापालिका प्रशासनाने बेडची उपलब्धता वाढविली आहे. यासाठी शहरातील 40 खासगी हॉस्पिटलमधील 2800 बेड उपलब्ध केले जाणार आहेत. कोरोनाबाधितांसाठी बेड शिल्लक ठेवण्याबाबत आयुक्तांनी खासगी रुग्णालयांना पत्र दिले आहे. घरकुलमधील कोविड केअर सेंटरही सुरु केले जाणार असल्याचे अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी सांगितले.

बेड उपलब्ध नसल्याची एकादी तक्रार येते असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, कोरोना लसीचे 40 हजार डोस उपलब्ध असून आणखी एक लाख डोस मागविले असल्याचेही त्यांनी सांगितले.

मागील महिन्यापासून शहरातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. दिवसाला 1300 हून अधिक रुग्ण सापडत आहे. रुग्ण वाढत असल्याने बेडची कमतरता जाणावत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी येत आहेत. याबाबत विचारले असता डॉ. साळवे म्हणाले, महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात कोरोनाबाधितांसाठी 210 बेड उपलब्ध आहेत.

नवीन भोसरी 100, नवीन जिजामाता रुग्णालयात 100, बालनगरीतील कोविड केअर सेंटरमध्ये 500 बेडची तयारी ठेवली आहे. सध्या तिथे 400 रुग्ण उपचार घेत आहेत. घरकुलमधील कोविड सेंटर सुरु केले जाणार आहे. तिथे 400 बेड संख्या आहे.

सध्या अनेक रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आहेत. त्यामुळे रुग्ण होम आयसोलेशनला प्राधान्य देत आहेत. गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांनाच हॉस्पिटलमध्ये दाखल केले जाणार नाही. लक्षणेविरहित रुग्णांवर कोविड केअर सेंटरमध्ये उपचार केले जाणार आहेत. लक्षणे नसलेले आणि वायसीएम रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांना सीसीसी सेंटरमध्ये शिफ्ट केले जाणार आहे.

जुन, जुलैमध्ये शहरातील खासगी रुग्णालयांमध्येही कोरोनाच्या रुग्णांवर उपचार केले जात होते. त्या रुग्णालयांनी नॉन-कोविड रुग्णांवर उपचार सुरु केले आहेत. कोरोनाची रुग्णसंख्या वाढू लागल्याने शहरातील 40 खासगी रुग्णालयांमधील 2800 बेड कोरोना बाधित रुग्णांसाठी उपलब्ध केले जाणार आहेत, असेही डॉ. साळवे यांनी सांगितले.

सरकारकडे मागितले 1 लाख डोस

आजपर्यंत शहरातील 80 हजारहून अधिक जणांनी कोरोनाची लस घेतली आहे. लसीकरणाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. महापालिका, खासगी रुग्णालय अशा 40 केंद्रावर कोरोना लसीकरण सुरु आहे. सध्या महापालिकेकडे कोरोना लसीचे 40 हजार डोस उपलब्ध आहेत. महापालिकेने आणखी एक लाख डोसची मागणी केली असल्याचेही डॉ. साळवे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.