Pimpri News: ‘बांधकाम कामगारांसाठी कामगार नाक्यावर अटल आहार योजना पूर्ववत सुरू करा’ – आमदार लक्ष्मण जगताप

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी राबवण्यात येणारी अटल आहार योजना पिंपरी-चिंचवडमधील विविध ठिकाणच्या कामगार नाक्यांवर पूर्ववत तातडीने सुरू करण्यात यावी, अशी मागणी आमदार लक्ष्मण जगताप यांनी कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली आहे.

यासंदर्भात आमदार जगताप यांनी कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांना ईमेल केलेल्या निवेदनात म्हटले आहे, “कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत या आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून राज्य सरकारने लॉकडाऊन जाहीर केले आहे. लॉकडाऊन लागून दोन आठवडे झाले आहेत. या कालावधीत कामगार घरातच राहिले आहेत. हाताला काम नसल्यामुळे कामगारांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे.

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळामार्फत नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी अटल आहार योजना लागू केली आहे. या योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांना कामाच्या ठिकाणी किंवा कामगार नाक्यावर मोफत जेवण पुरवण्यात येते. कोरोनाची पहिली लाट आली तेव्हा ही योजना राबवण्यात आली. त्यामुळे शेकडो नोंदणीकृत बांधकाम कामगारांना आपले पोट भरण्यासाठी ही योजना लाभदायी ठरली. परंतु, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर अटर आहार योजना बंद करण्यात आली. तसेच बांधकामाच्या ठिकाणीच या योजनेचा लाभ सुरू ठेवण्यात आला.

मात्र सध्या लॉकडाऊनमुळे कामच बंद असल्याने कामगार बांधकामाच्या ठिकाणी जाऊ शकत नाहीत. कामगार नाक्यावर ही योजना सुरू केल्यास उपासमारीची वेळ आलेल्या शेकडो बांधकाम कामगारांना मदत होईल. हातावर पोट असलेल्या या गोरगरीब कामगारांचा विचार करून महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत नोंदणीकृत असलेल्या बांधकाम कामगारांसाठी राबविण्यात येणारी अटल आहार योजना कामगार नाक्यावर पुर्ववत तातडीने सुरु करण्याचे संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना आपण आदेश द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.