Pimpri News: दळणाच्या दरात वाढ; ‘असे’ आहेत नवीन दर

एमपीसी न्यूज – वाढती महागाई, वाढते वीज बिल यामुळे त्रस्त झालेल्या पिंपरी – चिंचवड चालक-मालक पिठगिरणी महासंघाने 1 डिसेंबरपासून दळणाच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या सात वर्षात पहिल्यांदाच ही दरवाढ करण्यात आल्याचा दावा महासंघाने केला आहे.

महासंघाचे शहराध्यक्ष सुरेश लिंगायत यांनी याबाबत माहिती दिली. पिंपरी – चिंचवड चालक-मालक पिठगिरणी महासंघाची नुकतीच एक बैठक झाली. या बैठकीत दळणाच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीस महासंघाचे उपाध्यक्ष गुलाब वाल्हेकर, मोहन धुमाळ, दिपक बारणे, शहाजी घागडे, राहूल लांडगे, ज्ञानेश्वर काळभोर, रमेश पाटेकर, ज्ञानेश्वर हगवणे, सुरज बारणे, नागेंद्र जयस्वाल, बबलू जयस्वाल, संभाजी नढे, अरविंद जयस्वाल, जगजीवन जयस्वाल, धनंजय जयस्वाल आदी उपस्थित होते.

कोरोना प्रादूर्भावामुळे गेली सहा महिने वीजमीटर रिडींग झाले नाही. महावितरणने अंदाजे बीले दिली आहेत. वाढती महागाई, वाढत्या वीज बिलामुळे गिरणी मालकांना व्यवसाय करणे अवघड झाले आहे. त्यामुळे अनेक पीठगिरण्या बंद झाल्या आहेत. त्यातच घरोघरी घरघंटी आल्याने गिरणीत येणा-यांची संख्या रोडावली आहे. ही सर्व परिस्थिती लक्षात घेऊन दळणाच्या दरात वाढ करणे क्रमप्राप्त झाले आहे.

गेल्या सात वर्षात पहिल्यांदाच दरवाढ करण्यात आली आहे. 1 डिसेंबरपासून दळणाच्या दरात प्रति किलो 1 रूपया दरवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकांनी या दरवाढीस सहकार्य करावे, असे आवाहन लिंगायत यांनी केले आहे.

असे आहेत नवीन दर (किलोनुसार)

# गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ – 6 रूपये
# डाळ, भाजणी, नाचणी, मेथी, हुलगा – 8 रूपये
# ओले गहू, ओली ज्वारी – 10 रूपये
# मका – 12 रूपये

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.