Pimpri News : पावसाळ्यातही रस्ते खोदाई, डांबरीकरणाची कामे

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेने पावसाळ्यातही रस्ते खोदाईला परवानगी दिली आहे. डांबरीकरणाची कामे सुरु आहेत. खोदाईमुळे अपघातांचा धोका निर्माण होऊन शहरवासीयांच्या सुरक्षेचा प्रश्न  ऐरणीवर आला आहे. रस्ते खोदाई तातडीने बंद करावी आणि नागरिकांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करणा-या संबधितांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

वास्तविक पाहता पावसाळा सुरू झाल्यानंतर शहरात खोदाईशी संबधित कोणतीही कामे करणे उचित नाही. तरी देखील पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रात पावसाळा सुरू झाल्यानंतर देखील मोठ्या प्रमाणात कामासाठी खोदाई सुरू आहे. स्मार्ट सिटी कंपनीमार्फत सर्वाधिक रस्ते खोदण्यात आले आहेत. काही भागात ड्रेनेज, पावसाळी गटारे, पाणीपुरवठा वाहिन्यांसाठी मोठ मोठे खड्डे खोदण्यात आले आहेत. त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या खोदाई धोरणाप्रमाणे नियम, अटी -शर्तीचे पालन आणि सुरक्षेची योग्य खबरदारी घेतली जात नसल्याचे दिसून येते.

सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर म्हणाले, “महापालिकेचा ‘आंधळे दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय ‘ असा कारभार सुरू आहे. भर पावसात रत्यांवरील डांबरांची कामे व रस्ते खोदाई सुरू आहे. त्यामुळे सामान्य नागरिक तोंड दाबून बुक्यांचा मार सहन करीत आहेत. रस्त्यांची कामे मुदतीत पूर्ण न करणा-या ठेकेदाराला जाब विचारण्याची हिंमत टक्केवारीमुळे नगरसेवकांकडे नाही. त्यामुळे सामान्य नागरिकांना शारीरिक मानसिक, आर्थिक, मनस्ताप सहन करावा लागत आहे. सामान्य नागरिकांचे आरोग्य रामभरोसे असून ते धोक्यात आले आहे. पावसामुळे मच्छरांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला असून त्यामुळे डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया सारखे आजार मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे”.

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेेरे म्हणाले, “शहरात मोठ्या कामांबरोबर शहरातील सर्वच भागात अर्बन स्ट्रीट, सिमेंट रस्त्यांची कामे, तसेच किरकोळ दुरुस्तीची कामेही चालू आहेत. रस्त्यावर पडलेले चर योग्य पध्दतीने बुजविले जात नाहीत. परिणामी, थोड्या पावसात रस्त्यांमध्ये खड्डे पडल्याने पावसाळ्याच्या सुरुवातीला रस्त्यांची अवस्था दयनीय झालेली आहे. कोरोना संकटाचे कारण पुढे करत सद्यस्थितीत कामे सुरू आहेत. वास्तविक महापालिकेच्या स्मार्ट सिटी, ड्रेनेज, पाणीपुरवठाविषयक अत्यावश्यक कामांसह इतर कामांना निर्बध असतानाही परवानगी देण्यात आली होती. तरी देखील मुदतीत कामे पूर्ण न करता पावसाळ्यात शहरवासीयांचा जीव धोक्यात घालण्याचे काम महानगरपालिका करत आहेत”.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.