Pimpri News : रस्ते, बाजारपेठा गजबजल्या ; खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी

एमपीसी न्यूज – शहरात अनलॉक अंतर्गत नवीन नियमावली लागू करण्यात आली असून, दुपारी चार वाजेपर्यंत सर्व आस्थापना सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. दोन दिवसांच्या बंद नंतर आज (सोमवारी ) रस्त्यावर व बाजारपेठेत नागरिकांची मोठी गर्दी पहायला मिळाली. भाजी मंडई, हॉटेल, रेस्टॉरंट, किराणा दुकानात तसेच, पावसाळ्यापूर्वीच्या खरेदीसाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती.

पिंपरी चिंचवडमध्ये नवीन नियमावली अंतर्गत अत्यावश्यक सेवा तसेच इतर आस्थापना दुपारी चार वाजेपर्यंत सुरू ठेवण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. मॉल, सिनेमागृहे व नाट्यगृह बंदच राहणार आहेत. तसेच, हॉटेल रेस्टॉरंट पन्नास टक्के क्षमतेने सुरू राहतील. शनिवारी व रविवारी मात्र अत्यावश्यक वगळता अन्य सर्व बंद राहणार आहे.

आज (सोमवारी) जेव्हा बाजारपेठ खुली झाली तेव्हा मोठ्या प्रमाणावर नागरिक वाहनं घेऊन बाहेर पडले. अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी पहायला मिळाली. तसेच, पिंपरी भाजी मंडई व कॅम्प परिसरात खरेदी साठी आपलेल्या नागरिकांनी एकच गर्दी केली होती. अनेक ठिकाणी नागरिकांना सोशल डिसटन्सिंगचा विसर पडल्याचे पहायला मिळाले. शगुन चौक, चापेकर चौक, महावीर चौक याठिकाणी पोलिसांनी वाहन चालकांची चौकशी केली.

तब्बल दीड महिन्यानंतर पन्नास टक्के क्षमतेने सलून, जिम पुन्हा सुरू झाल्यानंतर अनेकांनी जिमला हजेरी लावली होती. फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना पीएमपीएमएलमधून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली असून दीड महिन्यानंतर पीएमपीएमएल रस्त्यावर धावल्या. दुपारी चार वाजेपर्यंत आस्थापना सुरू राहणार असून सायंकाळी पाच नंतर शहरात जमावबंदी लागू असेल. पाच नंतर पाच व पाच पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई असेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.