Pimpri News: ‘अफेरेसीस प्लाझ्मा’ बॅगेसाठी 6 हजार रुपये मोजावे लागणार; ‘स्थायी’ची मान्यता

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील खासगी रुग्णालयांमधील कोरोनाच्या रुग्णांसाठी 200 मिलीच्या अफेरेसीस प्लाझ्मा बॅगेकरिता 6 हजार रुपये मोजावे लागणार आहेत. याबाबतच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मान्यता दिली आहे. तसेच वायसीएम रुग्णालय, महापालिका हॉस्पिटल, सरकारी रुग्णालयांमधील रुग्णांसाठी रक्त व रक्तघटक (प्लाझ्मा) मोफत करण्यासही स्थायीने मान्यता दिली. प्लाझ्माची एक बॅग तयार करण्यासाठी 11 हजार 150 रुपये खर्च येतो. परंतु, महापालिका 6 हजार रुपयात बॅग उपलब्ध करुन देणार आहे.

प्लाझ्मा या उपचार पद्धतीचा वापर राज्यातील कोविड 19 आजारांवरील उपचारांकरीता समर्पित सर्व शासकीय, महापालिका, खासगी, निमशासकीय रुग्णालयांना सूचना दिल्या आहेत. प्लाझ्मा दात्यांकडून रक्तपेढी स्वयंचलीत अफेरेसीस प्लाझ्मा वेगळा करुन इतर सर्व पेशी दात्याला परत केल्या जातात. एका दात्याकडून दोन प्लाझ्मा बॅग्ज तयार करता येतात.

अफेरेसीस पद्धतीने संकलित केलेल्या प्रति डोस प्लाझ्मा बॅगसाठी (200 मिली प्लाझ्मा) खासगी, विश्वस्त रक्तपेढ्यांना, रुग्णालयांना रुग्णाकडून 5 हजार 500 रुपये प्रति बॅग इतके कमाल शुल्क (सर्व करांसहित) आकारण्यास राज्य सरकारने 24 सप्टेंबर 2020 रोजी मान्यता दिली आहे. तसेच केमिलुमिनेसन्स चाचणीसह प्लाझ्मा उपलब्ध करुन दिल्यास या चाचणीसाठी कमाल दर 500 रुपये (प्लाझ्मा बॅग किंमतीव्यतिरिक्त) दर आकारण्यास मान्यता दिली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेने अद्याप अफेरेसीस प्लाझ्मा बॅग्जचे शुल्क दर निर्धारित केलेले नाहीत. त्यामुळे पूर्वीचेच पूर्ण रक्तातून वेगळा केलेल्या प्लाझ्मा बॅग्जचे दर (400 रुपये प्रति बॅग्ज) खासगी रुग्णालयातील रुग्णांकरिता आकारला जात होता.

वायसीएम रुग्णालयातील रक्तपेढीत केमिलुमिनेसन्स चाचणीद्वारे प्रतिजैविकांची पातळी तपासल्यानंतर योग्य अशा प्लाझ्मा दात्याकडून अफेरेसीस मशीनद्वारे प्लाझ्मा संकलित केल्यानंतर त्यावर केमिलुमिनेसन्स ही चाचणी करुन रुग्णांना प्लाझ्मा उपलब्ध करुन दिला जात आहे.

सरकारच्या निर्णयानुसार खासगी रुग्णालयातील रुग्णांकरिता 200 मिलीच्या एका अफेरेसीस प्लाझ्मा बॅकरिता 6 हजार रुपये आकारण्यात येणार आहेत.

वायसीएम रक्त केंद्राकडे मोठ्या प्रमाणात महापालिका हद्दीतील व हद्दीबाहेरील खासगी रुग्णालयात दाखल असलेले रुग्ण रक्त व रक्तघटक घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात अर्ज करतात.

वायसीएम रुग्णालय, महापालिका हॉस्पिटल, सरकारी रुग्णालयांमधील रुग्णांसाठी रक्त व रक्तघटक (प्लाझ्मा) मोफत करण्यास आणि खासगी रुग्णालयांमधील रुग्णांसाठी अफेरेसीस प्लाझ्मा बॅगेकरिता 6 हजार रुपये आकारण्यास स्थायी समितीच्या 26 फेब्रुवारीच्या सभेत मान्यता देण्यात आली.

एक प्लाझ्मा बॅग तयार करण्यासाठी 11 हजार 150 रुपये येतो खर्च !

अफेरसीस प्लाझ्माची किट 9 हजार रुपयांना येते. त्यातून दोन प्लाझ्मा बॅग तयार होतात. रक्त गट व रक्त जुळणीच्या बॅगेला 150 रुपये खर्च येतो. रक्त संक्रमित आजाराच्या तपासण्या (एचआयव्ही, कावीळ, गुप्त रोग, मलेरिया) 800 ते 900 रुपये प्रति बॅग, रक्त पेढीतील उपकरणे, मनुष्यबळ, इतर ओवरहेड चार्जेस 300 ते 500 रुपये प्रति बॅग, प्लाझ्मा दात्याच्या प्लाझ्मा मधील कोविड 19 आजाराविरुद्ध तयार झालेल्या प्रतिजैविकांची पातळीचे प्रमाण तपासण्यासाठी प्रति बॅग 500 ते 600 रुपये असा 11 हजार 150 रुपये एक बॅग तयार करण्यासाठी खर्च येतो.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.