Pimpri News: भाजपाने मागील साडेचार वर्षाचा लेखाजोखा सादर करावा : सचिन साठे

एमपीसी न्यूज – मागील साडेचार वर्षापूर्वी अनेक आश्वासने देऊन पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजप सत्तेवर आली. आता त्यांच्या कार्यकाळ संपत आला असून शहर भाजपने नैतिक जबाबदारी म्हणून महापालिकेतील कारभाराचा लेखाजोखा जनतेसमोर सादर करावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव सचिन साठे यांनी केली आहे.

साठे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रात पुढे म्हटले आहे की, मागील सार्वत्रिक निवडणुकांवेळी केंद्रात आणि राज्यातही भाजपची सत्ता होती. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतही पूर्ण बहुमत मिळवून भाजपने सत्ता मिळवली. त्यामुळे शहरातील नागरिकांच्या भाजपाकडून स्वच्छ आणि गतिशील कारभाराच्या अपेक्षा होत्या. मागील सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी तत्कालीन पालकमंत्री गिरीश बापट यांनी पिंपरीत येऊन भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. लागलीच आमदार महेश लांडगे यांनी भोसरी विधानसभा मतदार संघाचा स्वतंत्र जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. या दोन्ही जाहीरनाम्यातील किती आश्‍वासने भाजपने पूर्ण केली. हे शहरातील करदात्या नागरिकांना कळणे अभिप्रेत आहे.

पिंपरी-चिंचवड शहरवासियांना पवना धरणातून पाणीपुरवठा होतो. पवना धरणातून रावेत जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत बंद जलवाहिनीतून पाणीपुरवठा करण्यासाठी सुरू केलेले काम मागील अकरा वर्षापासून बंद आहे. याची नैतिक जबाबदारी भाजप घेणार का ? शहर वासियांना चोवीस तास पूर्ण दाबाने पाणीपुरवठा करू, शहरातील अधिकृत बांधकामे नियमित करू, शहर झोपडपट्टीमुक्त करू, पवना आणि इंद्रायणी नदी प्रदूषण मुक्त करू अशा अनेक आश्वासनांचा भले भाजपाचा पदाधिकारी व नगरसेवकांना विसर पडला असेल, परंतु शहरातील मतदार नागरिक सुज्ञ आहेत. तसेच स्वच्छ आणि गतिशील प्रशासन भाजपच देऊ शकते अशी प्रतिमा भाजपने सोशल मीडियाद्वारे स्वतःच्या पक्षाची उभी केली आहे. परंतु हे देखील फसवे असल्याचे मतदारांच्या लक्षात आले आहे. मागील साडेचार वर्षात पिंपरी चिंचवड मनपा मध्ये भाजपने भ्रष्टाचाराचा कळस गाठला आहे. विरोधी पक्षांसह आता भाजपावर स्वपक्षीयांनीही भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. त्याची नैतिक जबाबदारी घेऊन शहर भाजपने मागील साडेचार वर्षातील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील कारभाराचा लेखाजोखा सादर करावा अशी मागणी साठे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.