Pimpri news: एफडीए व शासकीय सूचनेनुसारच ‘रेमडेसिवीर’ची विक्री

लोकमान्य हॉस्पिटलचा खुलासा

एमपीसी न्यूज – रेमडेसिवीर इंजेक्शनची सवलतीच्या दरातच विक्री केली जात आहे. रुग्णाची परिस्थिती गरीब असल्यास ‘ना नफा ना तोटा’ तत्वावर सामाजिक बांधिलकी म्हणून 1200 रुपयांना सुद्धा इंजेक्शनची विक्री केली आहे. दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट रुग्णांनाही एफडीए व शासकीय सूचनेनुसारच विक्री केली असल्याचा लेखी खुलासा लोकमान्य हॉस्पिटलचे सीईओ सुनील काळे यांनी महापालिकेला केला आहे.

इतर हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या कोरोना बाधित रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शनची चढ्या दराने विक्री केली जात असल्याचे ठपका ठेवत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी तीन हॉस्पिटलला कारणे दाखवा नोटीस बजाविली होती.

तसेच 48 तासाच्या आत खुलासा मागविला होता. ही नोटीस मिळताच लोकमान्य हॉस्पिटलचे सीईओ सुनील काळे यांनी महापालिकेकडे लेखी खुलासा सादर केला केला आहे.

आमच्याकडे लोकमान्य हॉस्पिटल ड्रग स्टोअर या नावाने अन्न व औषध परवाना आहे. फार्मासिटिकल कंपनीकडे आमचा कोड आहे. कंपनीकडून आम्हाला रेमडेसिवीर’ इंजेक्शनचे वितरण केले जाते.

रेमडेसिवीर इंजेक्शनची छापील विक्री किंमत 5 हजार 400 रुपये आहे. आमच्या संस्थेमार्फत 1200 ते 3000 हजार रुपये याप्रमाणे सवलतीच्या दरात विक्री केली जाते. अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या आव्हानाला पूर्णपणे प्रतिसाद देऊन आम्ही त्वरित सवलतीच्या दरात विक्रीला सुरुवात केली आहे.

आमच्या संस्थेत 170 च्या वर रुग्ण ॲडमिट असून रेमडेसिवीरचा तुटवडा असतानाही सवलतीच्या दरात रुग्णांना इंजेक्शन उपलब्ध करून दिले जाते. रुग्णाची परिस्थिती गरीब असल्यास ना नफा ना तोटा तत्वावर सामाजिक बांधिलकी म्हणून 1200 रुपयांना सुद्धा इंजेक्शनची विक्री केली आहे.

आम्हाला रेमडेसिवीर इंजेक्शन खरेदीसाठी कंपनीकडे ॲडव्हान्स पैसे देऊन 10 ते 15 दिवस इंजेक्शन मिळण्यासाठी वाट पहावी लागते. वाहतूक सुविधा, 24 तास सेवा उपलब्ध करून देण्यासाठी लागणारे फार्मसिस्ट आणि तत्सम सुविधेवरील खर्च बघता आम्ही जास्तीत जास्त सवलतीच्या दरात इंजेक्शन विकण्याचा प्रयत्न करतो.

दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट रुग्णांनाही एफडीए व शासकीय सूचनेनुसारच विक्री केली आहे. संपूर्ण कागदपत्रांचा तपशील आमच्या रेकॉर्डला नियमानुसार ठेवला आहे. आपणापर्यंत आलेली माहिती सत्य नसून आपण आमच्या संस्थेला कोविड 19 मध्ये रुग्णसेवा करण्यासाठी प्रोत्साहन आणि मार्गदर्शन करावे, असे काळे यांनी आपल्या खुलाशात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.