Pimpri News: पिंपरी चिंचवड शहरात संगीत अकादमी सुरु होणार

शास्त्रीय गायक महेश काळे आणि महापालिकेचा उपक्रम

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील विद्यार्थी आणि उदयोन्मुख कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी महेश काळे स्कुल ऑफ म्युझिक आणि महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने संगीत अकादमी सुरु होणार आहे. निगडीतील कलादालन येथे ही अकादमी सुरू होणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला महासभेने मान्यता दिली.

दरम्यान, सत्ताधारी हा प्रस्ताव दफ्तरी दाखल करणार होते. त्याला राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी विरोध केल्यानंतर भाजपने ‘दफ्तरी’ दाखल वगळून विषयाला मान्यता दिली.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्यावतीने सध्या निगडी, चिंचवड, संभाजीनगर, संत तुकारामनगर येथे संगीत अकादमी चालविल्या जातात. या संगीत अकादमीमध्ये शास्त्रीय गायन, सुगम गायन, तबलावादन, हार्मोनियम वादन आदी विषय शिकविले जातात.

या संगीत अकादमीमध्ये प्रशिक्षित झालेल्या विद्यार्थ्यांना अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय, मुंबई या अधिकृत संस्थेमार्फत परिक्षेस बसविले जाते. संगीत अकादमी सुरू झाल्यापासून अद्यापपर्यंत अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय यांच्या प्रारंभिक ते विशारद या परिक्षांमध्ये अंदाजे 1500 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

शहराचा आता स्मार्ट सिटीमध्ये समावेश झाला आहे. महापालिकेकडून नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. शहरात सांस्कृतिक चळवळ निर्माण व्हावी. तसेच नागरिकांचा सहभाग वाढविणे ही संकल्पना रूजण्यासाठी कला, संगीत अकादमीचे कामकाज विस्तारण्याची गरज निर्माण झाली आहे.

शहरात कला, संगीत अकादमीचे काम निरंतर चालवण्यासाठी प्रख्यात शास्त्रीय गायक महेश काळे यांनी 1 डिसेंबर 2020 रोजी ई-मेल द्वारे पिंपरी-चिंचवड शहरातील विद्यार्थी आणि उदयोन्मुख कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी महेश काळे स्कुल ऑफ म्युझिक आणि महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने संगीत अकादमी सुरू केल्यास ही अकादमी इतरांसाठी प्रेरणास्त्रोत ठरेल, असे कळविले आहे. त्यानुसार, संगीत अकादमी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या प्रकल्पाची अंमलबजावणी करताना महापालिकेचे 9 संगीत शिक्षक आणि अस्तित्वात असलेल्या जागेचा वापर करता येईल. त्याच बरोबरीने संपूर्ण संगीत अकादमीच्या कामकाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी एका प्रशासकीय अधिका-याची आणि दोन जादा संगीत शिक्षकांची नियुक्ती करणे गरजेचे आहे.

सध्याच्या संगीत अकादमीच्या दुरूस्तीसाठी पाच लाख ही खर्चाची मर्यादा राहील. टप्प्याटप्प्याने अकादमीस योग्य त्या सुविधा महापालिकेमार्फत निर्माण करण्यात येतील.

या बाबींबरोबर प्रेक्षागृह, संगीत सभागृह, कार्यशाळेसाठी जागा आणि जाहिरातीसाठी आवश्यक स्त्रोत या सर्व बाबींचा विचार करावा लागेल.

संगीत अकादमीत पहिल्या वर्षी 500 विद्यार्थी, दुस-या वर्षी 750 विद्यार्थी आणि तिस-या वर्षी एक हजार विद्यार्थी यांचा समावेश विचारात घेऊन प्रशासकीय व आवश्यक स्त्रोतांचे नियोजन करावे लागेल. महेश काळे यांनी अतिरिक्त स्त्रोताबाबतही माहिती दिली आहे.

संगीत अकादमीकरिता महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांसाठी मोफत व महापालिका शाळेव्यतिरिक्त विद्यार्थ्यांसाठी एक हजार रूपये असे मासिक शुल्क महेश काळे संगीत अकादमी आकारेल. पिंपरी-चिंचवड महापालिका अणि महेश काळे स्कुल ऑफ म्युझिक यांच्यावतीने ही संगीत अकादमी चालविण्यास येणा-या खर्चास महापालिका सभेची मान्यता घेणे आवश्यक आहे.

त्यासाठी करारनामा करून अकादमी चालविण्याचे अधिकार महापालिका आयुक्तांना देण्यात येणार होते. त्यानुसार, पिंपरी – चिंचवड स्कुल ऑफ म्युझिक निगडीतील कलादालन येथे सुरू करण्याच्या प्रस्तावाला महासभेने मान्यता दिली.

स्कुल ऑफ म्युझिकमध्ये या होत्या या प्रमुख बाबी

# सध्याच्या प्रगत पिढीनुरूप अद्ययावत अंतर्भाव असलेला अभ्यासक्रम
# सध्याच्या पिढीनुसार व संगीत क्षेत्रात होणा-या विविध बदलास अनुसरून राबविण्याची शैक्षणिक पद्धत
# अद्ययवत तंत्रज्ञानाचा वापर करून शिक्षण देणे. त्यासाठी विविध संकेतस्थळावरील उपलब्ध असलेले ख्यातनाम कलाकारांचे माहितीपट दाखविणे.
# विद्यार्थ्यांना यु-ट्युबद्वारे नामांकीत कलाकारांची, त्यांच्या घराण्याची तसेच नाट्यसंगीत, अभंग, ठुमरी, रविंद्र संगीत याद्वारे रागांची माहिती उपलब्ध करून देणे
# विद्यार्थ्यांचे व्हॉटसअप ग्रुप तयार करून त्यावर संगीत विषयक माहिती गोळा करून आदान-प्रदान करणे.
# इंटरनेटवर मिळणा-या ध्वनीफित व लेख
# संगीत कार्यशाळा, संगीत मैफल, महोत्सवाचे आयोजन करणे
# साऊंड इंजिनिअरींगचा आजच्या संगीतामध्ये असलेला प्रभाव आणि महत्व
# विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळण्यासाठी संगीत शिक्षकांच्या कामकाजाचे वेळोवेळी मुल्यमापन करणे
# विद्यार्थ्यांच्या अडचणी आणि त्यांच्या ध्येय प्राप्तीसाठी त्यांच्या अभ्यासाचे मुल्यमापन व मार्गदर्शन
# संगीत विद्यालयातील स्वतंत्र रियाज कक्ष, तांत्रिक दृष्ट्या अद्ययावत संगीत वर्ग, ग्रंथालय, प्रेक्षागृह, ध्वनीमुद्रण कक्ष, उपहारगृह, कलाकारांची राहण्याची व्यवस्था, पर्यावरणपुरक वातावरण

असे असणार होते संगीत अकादमीचे कामकाज !

#विद्यार्थ्यांसाठी नियमित संगीत वर्ग भरविणे
#शिक्षकांना प्रशिक्षण देणे
# विद्यार्थ्यांची सार्वजनिक कार्यक्रमांद्वारे वार्षिक प्रस्तुती
#संगीत कार्यशाळा, आमंत्रित तज्ञांचे तासिका वर्ग
# ग्रंथालय
# संगीत विषयक जोड शिक्षण
#शिष्यवृत्ती कार्यक्रम
#पर्यावरण संवर्धन

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.