Pimpri News: संजय कुलकर्णी यांना सहशहर अभियंतापदी पदोन्नती

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी यांना सहशहर अभियंतापदी (पर्यावरण) पदोन्नती देण्यात आली आहे. त्यांच्याकडे पर्यावरण अभियांत्रिकी विभागाच्या प्रमुखपदाचीही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. याबाबतचे आदेश आयुक्त राजेश पाटील यांनी काढले आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आस्थापनेवर सहशहर अभियंता (पर्यावरण) एक पद मंजूर आहे. महापालिका प्रशासकीय कामकाजाच्या सोयीच्या दृष्टीने आणि विभागाची आवश्यकता विचारात घेता हे पद सद्यस्थितीत रिक्त ठेवणे योग्य नाही. सेवाज्येष्ठ अधिका-यांना शासन मंजुरीच्या अधिन पदोन्नती देणे आवश्यक होते.

महापालिकेच्या पदोन्नती समितीची 17 जुलै 21 रोजी बैठक झाली. शैक्षणिक अर्हता, अनुभव कालावधी, आरक्षण, सेवाज्येष्ठता, गोपनीय अहवाल, संगणक अर्हता, मत्ता व दायित्व इत्यादी सेवा विषयक तपशील पडताळून सेवा ज्येष्ठतेनुसार कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी यांना सह शहर अभियंतापदी (पर्यावरण) बढती देण्यात आली. त्यांच्या आस्थापना विषयक बाबी पर्यावरण अभियांत्रिकी विभागामध्ये असणार आहेत.

कार्यकारी अभियंता (पर्यावरण) या पदावर अधिकारी नसल्याने कुलकर्णी यांना सह शहर अभियंता (पर्यावरण) आणि कार्यकारी अभियंता या दोन्ही पदांचे कर्तव्य पार पाडावे लागणार आहे. या पदांना प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करण्यास मान्यता दिली आहे.

त्याचबरोबर कार्यालयीन कामकाजाच्या सोयीच्या दृष्टीने प्रशासकीय कामकाजामध्ये सुसूत्रता आणणे, कामकाजातील विलंब टाळणे, त्वरित निर्णय घेणे, याकरिता महापालिका आस्थापनवेरील सह शहर अभियंता कुलकर्णी यांना पर्यावरण अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख म्हणून घोषित करण्यात आले आहे. विभागप्रमुखांना प्रदान केलेले अधिकार त्यांना दिले आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.