Pimpri News: सोमवारपासून शाळांची घंटा वाजणार, शाळांचे निर्जंतुकीकरण सुरु

एमपीसी न्यूज – कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने अनलॉकमध्ये मिशन बिगीन अगेन अंतर्गत येत्या सोमवार (23) पासून राज्यातील नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा प्रत्यक्ष सुरु होणार आहेत. पिंपरी महापालिकेने त्यादृष्टीने तयारी सुरु केली आहे. विद्यार्थ्यांच्या उपस्थितीतीसाठी पालकांचे समंतीपत्रक घेतले जात आहे. शाळांचे निर्जंतुकीकरण करण्याचे काम सुरु आहे. शिक्षकांची कोरोना चाचणी केली जात आहे. याबाबतची माहिती पालिकेचे प्रभारी शिक्षणाधिकारी पराग मुंढे यांनी दिली.

राज्य सरकारच्या आदेशानुसार सोमवारपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरु होणार आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत नववी ते बारावीपर्यंतच्या पालिका, खासगी अशा 282 शाळा आहेत.

त्यात पालिकेच्या नववी ते दहावीच्या 18 आणि 6 उर्दु अशा 24 शाळा असून 4490 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. 229 शिक्षक अध्यापनाचे काम करतात. तर, संपूर्ण शहरात पहिली ते बारावीपर्यंतच्या 658 शाळा आहे.

त्यामध्ये नववी ते बारावीच्या वर्गात 92 हजार 842 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या वर्गांसाठी 4 हजार 900 शिक्षक अध्यापनाचे काम करतात, असे मुंढे यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत पालकांचे संमतीपत्रक घेण्यात येत आहे. आजपर्यंत 30 टक्के पालकांनी संमती दर्शविली आहे. दररोज 50 टक्के विद्यार्थ्यांनाच प्रत्यक्ष शाळेत बोलविले जाणार आहे. तर, 50 टक्के विद्यार्थ्यांना ऑनलाईन अभ्यास दिला जाणार आहे. आदल्या दिवशी शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांना दुस-या दिवशी शाळेत बोलविण्यात येणार नाही.

बैठक व्यवस्थेत अंतर ठेवले जाणार आहे. एका बाकड्यावर एकच विद्यार्थ्यांला बसविण्यात येणार आहे. सुरक्षित अंतराचे काटेकोरपणे पालन केले जाणार आहे. दररोज शाळा भरण्यापूर्वी आणि सुटल्यानंतर वर्ग खोल्यांचे निर्जंतुकीकरण केले जाणार आहे. याबाबत सर्व मुख्याध्यापकांना सूचना दिल्याचेही त्यांनी सांगितले.

थर्मामीटर, थर्मल स्कॅनर, गण, ऑक्सीमीटरची व्यवस्था करण्याच्या सूचना खासगी शाळांना दिल्या आहेत. पालिकेच्या शाळांसाठी भांडार विभागाकडे मागणी केली आहे. शिक्षकांची कोरोनाची चाचणी करण्यात येत आहे. चाचणीचे प्रमाणपत्र शाळा व्यवस्थापनास सादर करायचे आहे. प्रमाणपत्र असल्याशिवाय शिक्षकांना शाळेत प्रवेश दिला जाणार नाही.

आठही प्रभागात शिक्षकांची कोविड चाचणी केली जात आहे. राज्य सरकारच्या सूचनेनुसार खासगी शाळातील शिक्षकांचीही कोरोना चाचणी पालिकेतर्फे मोफत करण्यात येत असल्याचे मुंढे यांनी सांगितले. कोरोना कालावधीत खासगी शाळांवर पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांचे नियंत्रण राहणार आहे. त्यांच्या आदेशानुसारच शाळांचे कामकाज होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.