Pimpri news: पालिकेकडून 15 दिवसांत 15 हजार नवीन, वाढीव मालमत्तांचा शोध

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड पालिकेकडून नवीन बांधकाम, वाढीव बांधकाम तसेच वापरात बदल झालेल्या मालमत्तांचे सर्व्हेक्षण सुरू आहे. पहिल्या 15 दिवसात 15 हजार नवीन मालमत्ता शोधल्या आहेत. जानेवारी 2021 पर्यंत 50 हजार मालमत्तांचा शोध घेण्याचे उद्दिष्ट सर्वेक्षण करणा-या खासगी संस्थेला दिले आहे. नवीन मालमत्तांमधून 100 कोटींचे वाढीव उत्पन्न पालिकेला अपेक्षित आहे.

कर आकारणीस पात्र असलेल्या सर्व मिळकतींची करआकारणी होण्यासाठी महापालिका कार्यक्षेत्रातील नवीन बांधकाम, वाढीव बांधकाम तसेच वापरात बदल झालेल्या मिळकतींचे 30 नोव्हेंबर 2020 पासून सर्व्हेक्षण सुरू आहे. त्यासाठी ऑरिअनप्रो सोल्युशन्स प्रा. लि. या संस्थेची नेमणूक केली आहे.

सर्वेक्षणा दरम्यान येणा-या अडचणी, आजपर्यंत झालेलेल्या सर्वेक्षणाची आढावा बैठक आज (गुरुवारी) झाली. प्रभारी अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांनी आजपर्यंतच्या कामकाजाचा आढावा घेतला. क्षेत्रीय अधिकारी मनोज लोणकर, अण्णा बोदडे, झोनल अधिकारी, मंडल अधिकारी बैठकीला उपस्थित होते.

महापालिकेच्या 16 करसंकलन विभागीय कार्यालयांमार्फत शहरातील इमारती व जमिनींची करआकारणी करण्यात येते. आकारणीस पात्र असलेल्या सर्व मालमत्तांची करआकारणी होण्याच्या दृष्टीने महापालिका कार्यक्षेत्रातील नवीन बांधकाम, वाढीव बांधकाम तसेच वापरात बदल झालेल्या मालमत्तांचे सर्व्हेक्षण केले जात आहे.

मागील 15 दिवसात 15 हजार नवीन, वाढीव मालमत्तांचा शोध घेण्यात आला आहे. तसेच जानेवारी 2021 पर्यंत 50 हजार नवीन मालमत्ता शोधण्याचे पालिकेचे उदिष्ट आहे. नवीन मालमत्तांची नोंदणी करुन त्यांना कर आकारणी केली जाणार आहे. त्यातून 100 कोटींचे वाढीव उत्पन्न पालिकेला अपेक्षित आहे.

मागील आर्थिक वर्षात डिसेंबरपर्यंत जेवढी कर वसुली झाली होती. तेवढी कर वसुली डिसेंबर 2020 अखेरपर्यंत करण्यात यावी. हे उद्दिष्ट पूर्ण करावे. त्यामध्ये कोणीही टाळाटाळ करु नये अशा सूचना अतिरिक्त आयुक्त पवार यांनी दिल्या आहेत.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.